पंचायत वेब सीरिजमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता जितेंद्र कुमार आणि मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट यांच्या आगामी डाळिंब या हिंदी सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील रहस्यमय आणि थरारक झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
ट्रेलरमध्ये काय आहे?
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून चित्रपटाची रहस्यमय आणि थरारक झलक पाहायला मिळते. मुंबईतील एका गगनचुंबी निवासी इमारतीमधून एक लहान मूल अचानक बेपत्ता होतं, तर दुसरीकडे एक मानसिक रुग्ण पळालेला असतो. या घटनेभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. या बेपत्ता होण्यामागं एखाद्या धोकादायक मारेकऱ्याचा हात आहे का? आणि नेमकं सत्य काय आहे, याचा शोध घेताना एकामागोमाग एक धक्कादायक पैलू समोर येतात. सुरुवातीला साधं वाटणारं प्रकरण अधिकाधिक अस्वस्थ करणारं रूप धारण करतं. बेपत्ता मूल आणि पळालेला मानसिक रुग्ण एका अस्वस्थ करणाऱ्या तपासात एकत्र येतात, ज्यामुळं एक अनपेक्षित तरीही भावनिकदृष्ट्या भारावून टाकणारी कथा समोर येते. या गुंतागुंतीच्या प्रवासात जितेंद्र कुमार सूरजच्या भूमिकेत आणि प्रिया बापट अतिशय गंभीर व आव्हानात्मक भूमिकेत दिसत आहेत. जितेंद्र कुमार यांचा नेहमीच्या हलक्याफुलक्या प्रतिमांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि गडद अंदाज या ट्रेलरचं मुख्य आकर्षण ठरत आहे.
कलाकार, निर्मिती आणि प्रदर्शनाची तारीख
भूमिकेबद्दल बोलताना जितेंद्र कुमार म्हणाले की, डाळिंबकडं त्यांना आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याची रंजक संकल्पना आणि कथा जशी पुढं जाते तसा हा सिनेमा विचार करायला भाग पाडतो. आपलं पात्र साकारणं हा एक रंजक अनुभव होता, कारण कथेला पुढं नेणाऱ्या सस्पेन्समध्ये भावनिकदृष्ट्या खूप काही शोधण्यासारखं होतं, असंही ते म्हणाले. प्रिया अवन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून, इलिप्सिस एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात जितेंद्र कुमार आणि प्रिया बापट यांच्यासह क्षितीश दाते, कविन दवे, साई प्रसाद, हरीश कुलकर्णी आणि सागर यादव यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरमधील गूढ वातावरण आणि उत्कंठावर्धक प्रसंगांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून, हा चित्रपट येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी थेट हिंदी झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा