पुण्यातील बोपदेव घाट परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. बसची वाट पाहत बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे येवलेवाडी आणि कोंढवा परिसरात शोककळा पसरली आहे.
बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास बोपदेव घाटाकडून येवलेवाडीच्या दिशेने एक टेम्पो भरधाव वेगात येत होता. येवलेवाडीकडून घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बसथांब्याजवळ वीस ते पंचवीस विद्यार्थी बसची प्रतीक्षा करत उभे होते. बसथांब्यापासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर वाहतूक धीमी झाली होती. त्याच वेळी टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने आधी पुढे जाणाऱ्या एका कारला मागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर अनियंत्रित टेम्पो थेट बसथांब्याच्या दिशेने गेला. तेथे थांबलेल्या विद्यार्थ्यांना त्याने धडक दिली.
दोघांचा जागीच मृत्यू, एकाचा रुग्णालयात
या धडकेत पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने भारती हॉस्पिटल, वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिक, कोंढवा येथील इनामदार हॉस्पिटल आणि ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. सिद्धेश राजे यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चालकाला ताब्यात घेतले; तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. परिसरात शांतता असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली. तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे येवलेवाडी आणि कोंढवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा