आश्वासन देणारे अनेक असतात, मात्र दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करणारे मोजकेच असतात. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तथा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी याचा प्रत्यय परभणीतून दिला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित भव्य महिला बचत गट मेळाव्याच्या निमित्ताने २४ नोव्हेंबर रोजी परभणीत आलेले सलीम सारंग यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेला शब्द पूर्ण केला.
१५ ऑगस्ट रोजी दिलेला शब्द पूर्ण
१५ ऑगस्ट रोजी परभणी येथील फैज कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. विशेषतः यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, हा त्यामागील उद्देश होता.
आपल्या परभणी दौऱ्यादरम्यान त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत फैज कॅम्पसला १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक सनाउल्लाह खान, शिक्षक सोहेल खान व शाळेतील कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
राज्यभर ३५ अभ्यासिका केंद्रांचा संकल्प
यावेळी सलीम सारंग यांनी आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३५ अभ्यासिका केंद्रे सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण आणि सुविधा मिळणे आवश्यक असते. ही केंद्रे त्या दिशेने एक पाऊल ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा