छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बालदिनानिमित्त २८ नोव्हेंबर रोजी किल्ला उद्यानात आयोजित करण्यात येणाऱ्या बाल मेळाव्याच्या नियोजनावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमासाठी करण्यात येणारी ई-निविदा प्रक्रिया आणि भोजनाच्या मेनूवरून महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सोनाली मगर आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींचे पती यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या बजेटच्या या कार्यक्रमावरून प्रशासन आणि समिती यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून दरवर्षी बालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा २८ नोव्हेंबर रोजी किल्ला उद्यानात बाल मेळावा होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे साडेआठ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, बालकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, नियोजनाला सुरुवात होताच प्रशासन आणि सभापतींच्या पतींमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे समजते.
ई-निविदेवरून मतभेद
कार्यक्रमासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी, भोजन व्यवस्था आणि इतर खर्चाची प्रक्रिया ई-निविदेद्वारे राबवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. सार्वजनिक निधी खर्च करताना प्रशासकीय नियम आणि पारदर्शकता राखणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, कार्यक्रमाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न सभापतींच्या पतींकडून उपस्थित करण्यात आल्याचे समजते. निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का आणि कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे, यावरून दोन्ही बाजूंमध्ये चर्चा तापली.
भोजनाच्या मेनूवरूनही वाद
याच मुद्द्यावरून सहाय्यक आयुक्त सोनाली मगर आणि सभापतींच्या पतींमध्ये वादाची ठिणगी पडली. जेवणात कोणते पदार्थ असावेत, किती प्रकारचे पदार्थ द्यावेत आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, यावरूनही मतभेद झाल्याचे समजते. बालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी साडेआठ लाख रुपयांची तरतूद असताना त्याचा विनियोग नेमका कसा होणार, यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या दालनात बैठक झाली असून, बैठकीत समेट घडवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा