लग्नातील मेहंदी सोहळा म्हटला की गाणी, नाच आणि उत्साह आलाच. नवरीच्या हातावर मेहंदी काढली जात असताना घरातील महिला आणि तरुणींचा आनंद काही वेगळाच असतो. अशा वेळी एक गाणे हमखास वाजते आणि सगळ्यांचे लक्ष त्याकडे वेधले जाते. विशेष म्हणजे हे गाणे नवीन नाही. तब्बल २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आजही मेहंदीच्या कार्यक्रमात तितक्याच आवडीने ऐकले जाते.
रहमान यांचे संगीत, अलका याज्ञिक यांचा आवाज
या गाण्याचे नाव ‘मेहंदी है रचने वाली’ आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुबैदा’ या सिनेमातील हे गाणे आहे. ए. आर. रहमान यांनी या गाण्याला संगीत दिले असून अलका याज्ञिक यांनी आपल्या सुरेल आवाजात ते गायले आहे. गाण्याची धून सुरू होताच मेहंदी सोहळ्याचा माहोल तयार होतो. नवरीसोबत तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबातील महिलाही या गाण्याचा आनंद घेतात.
गेल्या २५ वर्षांत अनेक नवीन गाणी आली आणि लग्नातील संगीताचे ट्रेंडही बदलले. मात्र या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. त्यामुळेच लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये या गाण्याला आवर्जून स्थान दिले जाते. गाण्यात करिश्मा कपूर यांचा साधा आणि सुंदर अंदाजही पाहायला मिळतो. गाण्याचे शब्द, संगीत आणि त्यातील गोडवा यामुळे ते श्रोत्यांच्या मनात घर करून राहिले आहे.
‘जुबैदा’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मेहंदी सोहळ्यातील आनंद आणि लग्नघरातील वातावरण अगदी सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे केवळ सिनेमापुरते मर्यादित राहिले नाही, तर प्रत्यक्ष लग्नसोहळ्यांचाही भाग बनले. ‘जुबैदा’ या सिनेमाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. करिश्मा कपूर, रेखा, मनोज बाजपेयी, रजित कपूर आणि अमरीश पुरी यांसारखे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते.
या सिनेमाची कथा जुबैदा बेगम यांच्या आयुष्यापासून प्रेरित होती. सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. करिश्मा कपूर यांना या सिनेमातील अभिनयासाठी फिल्मफेअर क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. सिनेमा प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली असली, तरी त्यातील हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. नवीन गाण्यांची कितीही भर पडली, तरी लग्नातील मेहंदी सोहळ्यात या गाण्याची जागा कायम आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा