भोजपुरी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते रवी किशन यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, या यशापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनय आणि नृत्याची आवड जोपासत असताना त्यांना स्वतःच्या कुटुंबाचाच विरोध सहन करावा लागला. नुकत्याच एका लोकप्रिय टॉक शोच्या नव्या हंगामात त्यांनी आपल्या आयुष्यातील एका धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या नवव्या हंगामात अक्षय कुमार आणि रवी किशन यांनी हजेरी लावली होती. गप्पा मारताना रवी किशन यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनय क्षेत्रात येण्याच्या त्यांच्या निर्णयाला वडिलांचा तीव्र विरोध होता; एकदा वडिलांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.
वडिलांची इच्छा वेगळीच होती
रवी किशन यांचे वडील पुजारी होते; याशिवाय त्यांचा दुधाचा व्यवसायही होता. त्यामुळे रवी यांनी हाच व्यवसाय पुढे चालवावा किंवा सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, रवी यांना अभिनय आणि नृत्याची आवड होती. घरच्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली होती. एकदा ते रामलीलेमध्ये साडी नेसून अभिनय करण्यासाठी गेले. ही गोष्ट समजल्यानंतर त्यांच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रवी यांना खूप मारहाण केली.
आईच्या साथीने मुंबईचा प्रवास
त्या काळात चित्रपटसृष्टीत काम करणे त्यांच्या कुटुंबात चांगले मानले जात नव्हते. त्यामुळे वडिलांना रवी यांचा अभिनय क्षेत्रातील निर्णय अजिबात पसंत नव्हता. रवी यांनी सांगितले की, त्यांचे वडील रागाच्या भरात म्हणायचे, ‘हा मुलगा कुटुंबाचे नाव खराब करेल, याला मारूनच टाकूया.’ वडिलांचा सततचा विरोध आणि मारहाण यामुळे रवी किशन यांनी अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला. या कठीण काळात त्यांच्या आईने त्यांना साथ दिली; घर सोडण्यासाठी आईनेच त्यांना मदत केली होती. त्यानंतर अभिनयात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रवी किशन मुंबईत आले. आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल बोलताना ते भावुक झाले. ‘लोक आयुष्यात चालत पुढे जातात, पण मी रांगत रांगत इथपर्यंत पोहोचलो आहे,’ असे त्यांनी म्हटले.
प्रतिक्रिया व्यक्त करा