पाकिस्तानमधील पहिली नेटफ्लिक्स सीरिज ‘जो बचे हैं संग समेट लो’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरमध्ये फवाद खान आणि माहिरा खान यांची झलक पाहायला मिळते. या सीरिजची कथा प्रेम, नाती, जुन्या जखमा आणि अपूर्ण भावनांभोवती फिरते.
प्रसिद्ध कादंबरीवर आधारित कथा
ही सीरिज प्रसिद्ध लेखिका फरहत इश्तियाक यांच्या लोकप्रिय उर्दू कादंबरीवर आधारित आहे. यात केवळ एक प्रेमकथा नाही, तर तीन पिढ्या आणि वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या अनेक कथांमधून प्रेमाचे बदलते अर्थ दाखवले जाणार आहेत. प्रेम, नुकसान, क्षमा आणि स्वतःला ओळखण्याचा प्रवास ही या कथेची मुख्य सूत्रे आहेत. रोम आणि पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर रचलेली ही कथा नाती, भावना आणि आयुष्यातील कठीण निर्णय समोर आणते.
तारांकित कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख
या सीरिजमध्ये फवाद खान, माहिरा खान यांच्यासह सनम सईद, अहद रजा मीर, हमजा अली अब्बासी, हानिया आमिर, इकरा अजीज, माया अली आणि बिलाल अशरफ यांसारखे कलाकार आहेत. मोमिना दुराईद यांच्या दिग्दर्शनात आणि निर्मितीत बनलेल्या या सीरिजचे संगीत रोहेल हयात यांनी तयार केले आहे. सीरिज दोन भागांत प्रदर्शित होणार असून पहिला भाग ४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येणार आहे. दुसरा भाग नंतर प्रदर्शित केला जाईल.
दरम्यान, या सीरिजवर भारतात बंदी घालण्याची मागणीही होत असल्याने ट्रेलरच्या चर्चेसोबतच वादही निर्माण झाला आहे.
Leave a Reply