गुजरातमध्ये एका मजूर कुटुंबावर झालेल्या हल्ल्याने दोन्ही राज्यांत खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सहा मजुरांना कालव्याच्या खोल पाण्यात फेकून देण्यात आले. या घटनेत पती-पत्नीसह एका मुलीचा मृत्यू झाला असून दोन मुले बेपत्ता आहेत. एका तेरा वर्षीय मुलाने मात्र प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला.
कामाच्या शोधात निघालेले कुटुंब
२१ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका गावातून हे कुटुंब चारचाकी वाहनाने सुरतकडे निघाले होते. कामाच्या शोधात ते निघाले असताना सुरत जिल्ह्यातील बार्डोली तालुक्यातील उवा गावाजवळ दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने उकाई-काकरापार डाव्या कालव्याच्या खोल पाण्यात फेकून देण्यात आले.
या घटनेत नितीन उर्फ भुरिया पाटील आणि कविता पाटील या पती-पत्नीसह एका मुलीचा मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह महुवा तालुक्यातील डुंगरी परिसराजवळील कालव्यात आढळले. प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
तेरा वर्षीय मुलामुळे प्रकरण उघडकीस
कालव्यात फेकल्यानंतर तेरा वर्षीय मुलाने पाईप पकडून स्वतःला सावरले आणि पाण्यातून बाहेर पडला. त्यानंतर तो जवळच्या एका हॉटेलमध्ये गेला आणि तेथे त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यामुळेच हे प्रकरण उजेडात आले.
या प्रकरणी बार्डोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरत ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास हत्येच्या दिशेने सुरू केला आहे. पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या अटकेसाठी ६० पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. आरोपींचा शोध आणि घटनेचा उलगडा करण्यासाठी आठ स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली असून, या शोधकार्यात स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथक, तांत्रिक पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बार्डोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत. जळगाव पोलीसही सुरत ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेत आहेत.
Leave a Reply