वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने कंत्राटी तत्त्वावर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरच्या १९ पदांवर भरतीसाठी अधिकृत सूचना जारी केली आहे. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट वॉक-इन इंटरव्यू, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाणार आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा?
सीआरपीएफच्या वेगवेगळ्या कंपोजिट हॉस्पिटल्समध्ये एकूण १९ जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये सर्जन पदासाठी ९ जागा, रेडिओलॉजी पदासाठी ४ जागा, ऑप्थेल्मोलॉजी पदासाठी २ जागा, ॲनेस्थीसिया पदासाठी २ जागा आणि प्रसूती व स्त्री रोग पदासाठी २ जागांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेत महिला आणि पुरुष उमेदवारांना सहभागी होण्याची संधी असेल.
पात्रता आणि मानधन
या पदांसाठी उमेदवाराकडे भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ अंतर्गत मान्यताप्राप्त ॲलोपॅथिक वैद्यकीय पदवी आणि अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. याशिवाय संबंधित विषयातील पीजी पदवीसह दीड वर्षाचा अनुभव किंवा पीजी डिप्लोमासह अडीच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवसापर्यंत उमेदवाराचे वय ७० वर्षांपेक्षा कमी असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८५ हजार रुपये मानधन दिले जाईल. कराराच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा दैनिक भत्ता दिला जाणार नाही.
मुलाखतीसाठी काय घेऊन जावे?
मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी संबंधित कंपोजिट हॉस्पिटलमध्ये कोऱ्या कागदावर लिहिलेला अर्ज, ज्यावर पदाचे नाव स्पष्टपणे नमूद असावे, पदवी प्रमाणपत्र, वयाचा दाखला आणि अनुभव प्रमाणपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे, त्यांच्या फोटोकॉपीज आणि अलीकडील ३ पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन जावेत. अधिक माहितीसाठी उमेदवार rect.crpf.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा 01124368630 या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात.
Leave a Reply