संजय राऊत यांनी मतदार यादीतून नावे हटवण्यासाठी एका खासदाराचा दर १५० कोटी रुपये असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर बोलताना अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दर ५० कोटींवरून आता १५० कोटी रुपये झाला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महागाई वाढत असल्याने खासदाराचे दरही वाढत असल्याची टिप्पणी त्यांनी केली. जनतेला काही मिळो अथवा न मिळो, पण आमदार आणि खासदारांचे खिसे भरलेच पाहिजेत आणि त्यांना गाड्या-घोडे मिळालेच पाहिजेत, असेही ते म्हणाले.
भाजपने राजकारणाची सुरुवात आमदार खरेदीपासून केली, असा आरोप दिपके यांनी केला. कर्नाटकात सरकार पाडले गेले, मध्य प्रदेशात सरकार पाडले गेले आणि आता देशभरात १३ कोटी मते हटवण्यात आली आहेत, असा दावा त्यांनी केला. २०२४ च्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार दोन टक्क्यांच्या फरकाने तयार होऊ शकले नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. देशात ९८ कोटी मतदार आहेत आणि त्यापैकी १३ ते १४ कोटी मते हटवली जात असतील, तर ती जवळपास १३ ते १४ टक्के मते होतात, असा हिशेब त्यांनी मांडला.
निवडणुका कशासाठी, असा सवाल
जिथे निवडणुका दोन टक्क्यांवर ठरतात, तिथे १३ ते १४ टक्के मते हटवली जात असतील तर निवडणुका घेण्याची गरजच काय, असा सवाल दिपके यांनी केला. निवडणूक घेण्याची गरज नाही, सरळ नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहणार आहेत, असे जाहीर करावे, असे ते म्हणाले. मतदान कोणालाही केले तरी सत्ता भाजपाचीच राहते, अशी टीका त्यांनी केली.
सौरभ दास यांना ऑक्सफर्ड युनियनने बोलावले होते, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. यावर बोलताना दिपके म्हणाले की, भाजप आणि त्यांचे समर्थक शाळेत किंवा महाविद्यालयात गेलेले नाहीत, त्यामुळे विद्यापीठ म्हणजे काय आणि युनियन म्हणजे काय, हे त्यांना माहीत नाही. ऑक्सफर्ड युनियन हे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे संघटन आहे. शाखेत चड्डी घालून हातात लाठी घेऊन जाणाऱ्यांना या गोष्टी कशा कळणार, असा टोला त्यांनी लगावला. त्यांचे महामानव कधी महाविद्यालयात गेले नाहीत, आधी त्यांची पदवी दाखवावी आणि मग ज्ञान द्यावे, असेही ते म्हणाले.
निवडणुका तरुणांच्या मुद्द्यांवर व्हाव्यात
सीजेपी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका दिपके यांनी स्पष्ट केली. देशात निवडणुकांचे मुद्दे कोणते असले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. देशात ४७ टक्के तरुण लोकसंख्या आहे, त्यामुळे निवडणुका तरुणांच्या मुद्द्यांवर झाल्या पाहिजेत. शिक्षण चांगले झाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. कोणत्या मंदिराखाली मशीद आहे किंवा कोणत्या मशिदीखाली मंदिर आहे, यापुढे जाऊन निवडणुका झाल्या पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते.
आंदोलनाचा एवढा त्रास होत असेल तर भाजपने सरकारमधून उतरून जावे आणि काँग्रेसचे किंवा दुसऱ्या कोणाचे सरकार बसवावे, असे आव्हानही दिपके यांनी दिले. त्याच मुद्द्यांवर आंदोलन करून भाजपला त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले. ज्या गोष्टी घडतात त्यासाठी जे जबाबदार आहेत, त्यांच्याच विरोधात आंदोलन करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे सरकार २२ राज्यांत आहे, त्यामुळे देशभरात जे घडते त्याची जबाबदारी त्यांचीच आहे, असा आरोप त्यांनी केला.
Leave a Reply