अमेरिका लवकरच व्यापाराबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारतासह डझनभर देशांवर नवे टॅरिफ लादले जाण्याची शक्यता असून, कोणत्याही क्षणी यासंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. अमेरिकेत सध्या महागाई प्रचंड वाढली आहे आणि त्याचे परिणाम जागतिक बाजारावरही दिसू लागले आहेत. अशा स्थितीत अमेरिकेच्या या पावलामुळे जगभरातील व्यापारात खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.
अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर होते. या काळात चीन, अमेरिका आणि रशिया या तीन मोठ्या शक्तींमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. रशिया आणि अमेरिकेत अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी भविष्यात एकत्र काम करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता टॅरिफचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ग्रीर यांचा अहवाल आणि १४ देशांवरील आरोप
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर या आठवड्यात यासंदर्भातील आपले निष्कर्ष जाहीर करणार आहेत. अमेरिकेच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, चीन आणि युरोपियन युनियनसह १४ देश आपल्या देशांतर्गत उद्योगांना सरकारी अनुदान आणि मदत देतात. ग्रीर यांच्या मते, या सरकारी मदतीमुळे त्या देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील कंपन्या जगभरात अत्यंत कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर माल विकतात आणि त्याचा थेट फटका अमेरिकन उत्पादकांना बसतो.
भारतासह कोणत्या देशांवर संकट?
टॅरिफ वाढवण्याबाबत सध्या विचार सुरू असून, ट्रम्प प्रशासन लवकरच यावर अंतिम निर्णय घेईल. या नव्या टॅरिफचे संकट भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियासह युरोपियन युनियनच्या सर्व २७ सदस्य देशांवर आहे. ज्या देशांवर आधीच टॅरिफ लागू आहे, तो आणखी वाढवला जाण्याचीही शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लादला होता. त्यामुळे भारतासाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा