अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जागतिक व्यापारात पुन्हा एकदा मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहेत. एका अहवालानुसार, ट्रंप प्रशासन भारत आणि चीनसह जगातील अनेक प्रमुख देशांवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क वाढवण्याची योजना आखत आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर या आठवड्यात यासंदर्भातील तपासाचे निष्कर्ष जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाला तर त्याचा भारतीय निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो.
शुल्कवाढीचा प्रस्ताव का?
अमेरिकन उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी ट्रंप प्रशासनाने हे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. चीन, युरोपियन युनियन आणि इतर १४ देश आपल्या देशांतर्गत उद्योगांना मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान आणि मदत देतात, असा दावा अमेरिकेच्या अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणाची गेल्या अनेक महिन्यांपासून चौकशी सुरू होती.
ग्रीर यांच्या मते, या सरकारी मदतीमुळे संबंधित देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त औद्योगिक उत्पादन क्षमता निर्माण झाली आहे. परिणामी, या बाजारपेठांमधील कंपन्या जगभरात अत्यंत कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर माल विकत असून, त्याचा थेट फटका अमेरिकन उत्पादकांना सहन करावा लागत आहे.
कोणत्या देशांवर परिणाम होणार?
शुल्क वाढवण्याबाबत अद्याप ट्रंप प्रशासनाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा देशांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार या संभाव्य निर्णयाचा फटका अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांना बसू शकतो. या नवीन शुल्काच्या कक्षेत चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन युनियनच्या सर्व २७ सदस्य देशांसह डझनभर देशांचा समावेश असू शकतो. ग्रीर या आठवड्यात या तपासाचे निकाल जाहीर करू शकतात, मात्र घोषणेच्या वेळेत बदल होण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी यापूर्वीही भारत आणि चीनसह अनेक देशांवर मोठे शुल्क लादले होते, जे नंतर कमी करण्यात आले. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच नवीन व्यापार करार होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, या नवीन शुल्काच्या चर्चेमुळे जागतिक बाजारपेठेचे लक्ष याकडे लागले आहे.
Leave a Reply