प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या कुटुंबात आनंदाची बातमी आहे. त्यांचा १९ वर्षांचा मुलगा निवान याने संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. शॉर्ट फिल्म स्लाईडच्या माध्यमातून निवानने आपल्या स्वतंत्र कारकिर्दीची सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने सोनू निगम यांनी पत्नी मधुरिमा निगम यांच्यासह ही आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली.
वडिलांपेक्षा वेगळी वाट निवडली
निवानने स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी आजोबा आणि वडिलांपेक्षा वेगळी वाट निवडली आहे, असे सोनू निगम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एकेकाळी वडिलांसमोर गायलाही लाजणारा निवान आज व्होकल कोचकडून प्रशिक्षण घेत आहे आणि दिवसातील तब्बल १६ तास गाण्याचा सराव करत आहे. त्याच्या तयारीत डान्स रिहर्सल आणि फिटनेस रुटीनचाही समावेश आहे. दिग्गज संगीतकार पू बेअर यांच्यासोबत स्टुडिओमध्ये त्याने एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग केल्याचेही सोनू यांनी सांगितले.
चार वर्षांच्या वयापासून गायनाची सुरुवात
निवान चार वर्षांचा असताना स्टुडिओत त्याने कोलावेरी डी हे गाणे म्हटले होते, तर साडेचार वर्षांच्या वयात त्याने स्टेजवर अभी मुझमें कहीं हे गाणे सादर केले होते. सोनू निगम यांनी आपल्या पोस्टमध्ये निवानच्या लहानपणाच्या परफॉर्मन्सची झलकही शेअर केली आहे. तीन मिनिटांच्या जॉगिंगमध्येही थकणारा मुलगा आज तासनतास डान्सची प्रॅक्टिस करत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवानने संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Leave a Reply