गोव्याच्या ग्रामीण भागातील विकासाच्या संधींचा प्रभावी वापर करून रोजगारनिर्मिती, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) गोवा प्रादेशिक कार्यालयातर्फे मंगळवारी पणजी येथे राज्यस्तरीय ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले.
गोवा सरकारचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत राज्य सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक, राज्यस्तरीय बँकर्स समिती, आयसीएआर-सीसीएआरआय, बँका, तांत्रिक संस्था आणि विकास संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
१७,३४३ कोटींची पतपुरवठा क्षमता
गोव्याच्या उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती या जिल्ह्यांसाठी २०२७-२८ या आर्थिक वर्षाकरिता तयार करण्यात आलेल्या संभाव्यतायुक्त पतपुरवठा आराखड्यांच्या आधारे ग्रामीण विकासाच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला. या आराखड्यांनुसार राज्यातील प्राधान्य क्षेत्रांसाठी एकूण १७,३४३ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याची क्षमता निश्चित करण्यात आली आहे.
या निधीचा प्रभावी वापर करण्यासाठी व्यवहार्य प्रकल्प, आवश्यक पायाभूत सुविधा आणि विविध विभागांमधील समन्वय महत्त्वाचा असल्याचे परिषदेत अधोरेखित करण्यात आले. मुख्य सचिवांनी ‘विकसित गोवा २०३७’ या राज्याच्या व्यापक विकास दृष्टिकोनाशी परिषदेतील चर्चेचा संबंध जोडला. परिषदेतून पुढे येणाऱ्या शिफारशींचे प्रत्यक्ष आणि मोजता येण्याजोग्या विकासकामांमध्ये रूपांतर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
काजू, फलोत्पादन आणि मत्स्यव्यवसायाला प्राधान्य
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काजू बागांचे पुनरुज्जीवन आणि प्रक्रिया उद्योग, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुखाद्य व्यवस्था, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण लघू व मध्यम उद्योग, भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांना प्रोत्साहन तसेच पर्यटनाशी संबंधित रोजगारनिर्मिती या क्षेत्रांतील संधींवर परिषदेत विशेष चर्चा झाली.
ग्रामीण भागातील आर्थिक उपक्रमांना बळकटी देण्यासाठी खाजन जमिनींच्या बंधाऱ्यांचे आणि जलनिस्सारण व्यवस्थेचे पुनर्वसन, लघुसिंचन, जलसंधारण, शीतसाखळी आणि ग्रामीण वाहतूक व्यवस्था यांसारख्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. शेतकरी उत्पादक संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, स्वयं-सहायता गट आणि सहकारी संस्थांची क्षमता वाढविण्यावरही भर देण्यात आला.
कुशावती जिल्ह्याच्या ग्रामीण विकासावर परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या परिषदेतील चर्चेचा आणि शिफारशींचा उपयोग नाबार्डकडून २०२७-२८ चा राज्यस्तरीय लक्ष केंद्रित अहवाल तयार करताना करण्यात येणार आहे.
Leave a Reply