जगातल्या विविध बड्या कंपन्यांमधून नोकर कपातीच्या बातम्या येत असताना भारतात जिओस्टार या मीडिया कंपनीने कर्मचारी कपात जाहीर केली आहे. कंपनीतील सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे. कंपनीत पुनर्रचना करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्य म्हणजे यातून ज्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे त्यांना आधार देण्यासाठी कंपनीने काही योजना आखल्या आहेत.
बाधित कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांचा पगार
जिओस्टारच्या नोकर कपातीत ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर परिणाम होईल किंवा ज्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येईल त्यांना कंपनीकडून सहा महिन्यांचा पगार सेपरेशन पॅकेज म्हणून देण्यात येईल. त्याचबरोबर चालू वर्षासाठी प्रो-रेटा बोनसही देण्यात येईल. प्रो-रेटा बोनस म्हणजे कपात होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात जितका काळ सेवा दिली आहे त्या कालावधीच्या प्रमाणात मिळणारा बोनस. उदाहरणार्थ, जर कंपनीची आर्थिक बोनस रक्कम ६०,००० रुपये असली आणि कमी होणाऱ्या कर्मचाऱ्याने या आर्थिक वर्षात ६ महिन्यांची सेवा दिली असेल तर नियमांप्रमाणे या कर्मचाऱ्याला प्रो-रेटा बोनस म्हणून ३०,००० रुपये मिळतील.
कोणत्या विभागांवर परिणाम होणार?
जिओस्टारच्या या नोकर कपातीचा परिणाम कंपनीतील प्रोडक्शन, मार्केटिंग, स्टुडिओ तसेच इतर ऑपरेशनल विभागांतील कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. मुळात व्यवसायातील कामकाजात सुधारणा करण्यासाठी, पोर्टफोलिओत पुनर्रचना तसेच खर्चावर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी जिओस्टार नोकर कपात करत असल्याचे वृत्तात नमूद आहे. या नोकर कपातीत आठवड्याभरात १५० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात असा अंदाज आहे. पण कंपनीकडून नोकर कपातीचे अधिकृत आकडे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
याआधीही झाली होती मोठी नोकर कपात
मार्च २०२५ मध्ये रिलायन्सच्या व्हायकॉम१८ तसेच डिस्नेच्या स्टार इंडिया या दोन्ही मीडिया कंपन्यांचे विलिनीकरण झाले. या काळात कंपनीतील बहुतेक कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागली होती. दोन्हीही कंपन्यांत समान पदांवर अनेक कर्मचारी कार्यरत असल्याने या कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यावर एकाच कामासाठी अनेक कर्मचारी उपलब्ध असल्याने कंपनीला कर्मचारी कपात करावी लागली होती. त्या काळात ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागली होती.
Leave a Reply