मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील एका 17 वर्षीय आदिवासी तरुणीने स्वतःचा बालविवाह रोखून असामान्य धैर्य दाखवले आहे. तिच्या या कामगिरीचे कौतुक इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू कर्णधार आणि युनिसेफचा सदिच्छादूत डेव्हिड बेकहम याने केले आहे.
हिमा या तरुणीने शाळेतील शिक्षकांच्या मदतीने आपला बालविवाह रोखला. आता ती आपल्या शिक्षकांच्या पावलांवर पाऊल ठेवत दुसऱ्या मुलींचे भविष्य सावरण्यासाठी मदत करण्याचे स्वप्न पाहत आहे. कुटुंबीय आणि समाजाकडून बालविवाहासाठी दबाव आणला जात असतानाही या 17 वर्षीय मुलीने त्याचा ठामपणे विरोध केला आणि स्वतःचा बालविवाह रोखला. तिने शिक्षण, वैयक्तिक विकास आणि भविष्यातील स्वप्नांना प्राधान्य दिले.
बेकहमची इंस्टाग्राम पोस्ट
दिग्गज फुटबॉलपटूने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणाला की, युनिसेफसोबत मागील 20 वर्षांच्या कामादरम्यान त्याने पाहिले की, योग्य पाठिंबा मिळाल्यानंतर मुली कशाप्रकारे नेतृत्व करू शकतात, पुढे जाऊ शकतात आणि आपले निर्णय स्वतः घेऊ शकतात.
जागतिक बालदिनानिमित्त आपल्या पोस्टमध्ये बेकहमने हिमाची गोष्ट सांगितली. युनिसेफ आणि तिच्या सहकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कार्याशिवाय अशा कथा केव्हाच घडणार नाहीत, असेही त्याने नमूद केले. त्याच्या या कौतुकानंतर झाबुआची ही तरुणी चर्चेचा विषय बनली असून, लोक तिच्या धैर्याची प्रशंसा करत आहेत.
मुलांना सातत्याने पाठबळ देण्याचे आवाहन
या जागतिक बालदिनानिमित्त आणि त्यानंतरही जगभरातील मुलांना आणि तरुणांना सातत्याने पाठबळ दिले पाहिजे, असे बेकहमने म्हटले आहे. त्यांची प्रगती नशिबावर अवलंबून राहता कामा नये. संघर्ष, हवामान बदल आणि निधीतील कपात यांसारख्या गोष्टी त्यांच्या प्रगतीसमोर अडथळे निर्माण करत आहेत. मात्र, भविष्यात काय घडणार हे आपल्या सामूहिक निर्णयांवर अवलंबून आहे. प्रत्येक मुलासाठी एक चांगले भविष्य निवडूया, असे आवाहन त्याने केले.
रविवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी प्रसिद्धिपत्रकानुसार, झाबुआ येथील या किशोरवयीन मुलीने असामान्य धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला आहे. स्थानिक कार्यकर्ते, समुदायातील नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या मुलीला पाठिंबा दिला आहे. तिला कोणत्याही भीतीशिवाय किंवा दबावाशिवाय आपले शिक्षण आणि क्रीडा उपक्रम सुरू ठेवता यावेत, यासाठी आवश्यक ती मदत केली जात आहे.
Leave a Reply