बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

वाघोलीत भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू, दोघे जखमी

पुण्यातील वाघोलीत सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव कार दुभाजकाला धडकून उभ्या ट्रकवर आदळली.

वाघोलीत भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू, दोघे जखमी

पुण्यातील वाघोली परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला आदळली गेली.

हा अपघात सोमवारी (दि. 23) मध्यरात्री एकच्या सुमारास वाघोली परिसरातील कटकेवाडी फाटा परिसरात घडला. संबंधित पाचही मित्र पुण्यातील वाघोली परिसरात राहायला असून, खासगी नोकरी आणि व्यवसाय करीत होते. सोमवारी रात्री एकच्या सुमारास ते कारने पुणे-अहिल्यानगर रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी मयूर औटी हा गाडी चालवत होता. कटकेवाडी फाटा कमानीजवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला धडकून पुढे रस्त्याकडील ट्रकवर (एमएच 16 बीसी 8174) जाऊन आदळली. अपघातातील कार (एमएच 12 केई 4174) मयूर औटी याच्या मालकीची आहे.

मृत आणि जखमींची ओळख

या अपघातात ओंकार अजय सूर्यवंशी (वय 24, रा. प्रभुरामनगर, वाघोली), मयूर सतीश औटी (वय 26, रा. वाघोली, मूळ रा. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि शंकर वासुदेव ढोळे (वय 22, रा. प्रभुरामनगर, वाघोली, मूळ रा. हिंगोली) यांचा मृत्यू झाला. तर आशुतोष नंदकुमार मरकड (वय 28, रा. प्रभुरामनगर, वाघोली) आणि प्रणय भरत शिंदे (वय 24, रा. मांजरी खुर्द, ता. हवेली) हे दोघे जखमी झाले आहेत.

पोलिसांचे तत्काळ बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका येईपर्यंत पोलिस अमलदारांनी जखमींना सीपीआर देऊन जीव वाचवण्याची पराकाष्टा केली. घटनास्थळी पोहोचलेल्या अमलदारांनी अपघातग्रस्त गाडीतील सर्वांना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून आय मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या 25 ते 27 वयोगटातील तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करीत आहेत.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance