शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळातील घटनांवर महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका दाव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आपली बाजू मांडली. शिरसाट यांनी म्हटलं होतं की बंडाच्या वेळी सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराच्या बाबतीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आपल्याला संपवण्याचा कट असल्याचा आरोप केला होता.
पहिली गाडी माझी होती, बापू पाटील यांचा खुलासा
बंडाच्या वेळी अशी कोणतीही परिस्थिती आपल्याला दिसली नाही, असं पाटील म्हणाले. लोक वेगवेगळ्या टप्प्यांत गेले आणि ते स्वतः पहिल्या टप्प्यात होते. मुंबई सोडून सुरतकडे निघालेली पहिली गाडी त्यांचीच होती, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मागून येणाऱ्यांचं काय घडलं, हे आपल्याला माहीत नाही, असंही ते म्हणाले. तिकडे जाताना सगळ्यात निराश शिंदे होते. आमदारांच्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागला, अन्यथा आमदारांचा गट रागाच्या भरात दुसऱ्या पक्षात गेला असता, असं पाटील यांनी सांगितलं.
परतू इच्छिणाऱ्यांना परवानगी, देशमुखांना विशेष विमान
प्रवास सुरू झाल्यावर आणि गावाकडे कळल्यावर काही मित्रांना माघारी फिरावं असं वाटत होतं. ज्यांनी परतण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना शिंदे यांनी लगेच घराकडे जाण्याची परवानगी दिली. नितीन देशमुख यांना विशेष विमान करून नागपूरला पाठवण्यात आलं. त्यांच्या घरच्यांना फोन करून नितीन आनंदात आणि व्यवस्थित असल्याचं सांगण्यात आलं. शिंदे यांचा कोणावरही माझ्याकडे या असा आग्रह नव्हता, असं पाटील म्हणाले. शिरसाट यांच्या विधानात तथ्य नाही, असं सांगत कैलास पाटील यांनीही त्याला फार महत्त्व देऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. एका शब्दावरून वाद लांबवणं राज्याच्या, दोघांच्या किंवा जनतेच्या हिताचं नाही. दोघांनी दुष्काळावर बोलावं, असंही पाटील म्हणाले.
Leave a Reply