शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले नाही, तर शरद पवार गट भाजपसोबत जात एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे आणि पक्षात त्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनबाबत पक्ष सकारात्मक असल्याचे विधान केले होते. मात्र शरद पवार गटाची भूमिका अजून स्पष्ट नाही आणि खासदारांकडून तळ्यातमळ्यात असल्यासारखी विधाने केली जात असल्याचे समोर आले आहे.
सुप्रिया सुळे यांची भूमिका आणि विरोध
सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव असेल, तर डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शविली होती. मात्र त्यांच्या या भूमिकेला पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी थेट विरोध केला.
केंद्राकडून प्रस्तावित डिलिमिटेशनमध्ये प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. लोकसंख्येच्या आधारावर काही राज्यांवर अन्याय होणार नसेल आणि सर्व राज्यांना समान प्रमाणात जागा वाढवून दिल्या जाणार असतील, तर या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करता येईल, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती.
मोहिते पाटील यांचे विधान
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा पक्ष केंद्रात एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. मात्र सरकारकडून डिलिमिटेशन कसे करणार आहेत, याचे अजून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्यावेळी सरकार स्पष्टीकरण देईल, त्यावेळी पक्षाच्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल, अशी माहिती माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या सर्व चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.
Leave a Reply