राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष केंद्रात एनडीए सोबत जाणार का, या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून या चर्चांना जोर आला आहे. पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना या विषयावर आपली भूमिका मांडली.
केंद्र सरकारला देशात डिलिमिटेशन विधेयकावर तोडगा काढायचा आहे. मात्र त्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. केंद्रातील मंत्र्यांकडून विरोधकांनी या प्रकरणात पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मांडली जात आहे. याच विधेयकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमधील मतभेद समोर आले होते.
सरकारच्या स्पष्टीकरणानंतर बैठकीत निर्णय
डिलिमिटेशन कसे करणार आहेत, याचे सरकारकडून अजून स्पष्टीकरण आलेले नाही, असे मोहिते पाटील म्हणाले. सरकार स्पष्टीकरण देईल, त्यावेळी पक्षाच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या चर्चांवर त्यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुळे यांच्या भूमिकेवरून मतभेद
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीएत सामील होण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. डिलिमिटेशननंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे इंडिया आघाडीचे मत नाही आणि महाविकास आघाडीचेही मत नाही, असे म्हटले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी डिलिमिटेशनला विरोध दर्शवला आहे.
जागा ५० टक्क्यांनी वाढणार असतील, तर आपण डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपकडून अनेकांनी महाविकास आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाला पाठिंबा देतील, असे सांगितले. मात्र या विधेयकावरून काँग्रेसने विरोधाची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी विधेयक आल्यानंतर सविस्तर भूमिका मांडेन, असे म्हटले आहे.
Leave a Reply