मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ५ डिसेंबरपासून तुळजापूरपासून संवाद यात्रा सुरू करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. हैदराबाद गॅझेटवरून मराठा बांधवांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
रमेश केरे पाटील काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचे केरे पाटील म्हणाले. सापडलेल्या ५८ लाख नोंदी महाराष्ट्राच्या आहेत की मराठवाड्याच्या आहेत, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला होता, मात्र अद्यापही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ५०८८ मुलांना नियुक्त्या देण्याचे काम झाले आणि अण्णासाहेब महामंडळालाही भरीव निधी मिळत होता. शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय मिळत होता, असेही केरे पाटील म्हणाले.
प्रत्येक सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला. विखे पाटील आंदोलन उभे करून कोणता तरी जीआर दाखवून फसवणूक करतात, असेही ते म्हणाले. हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देऊ, नाही दिले तर राजीनामा देईन, असे प्रसाद लाड बोलले होते; त्यांनी राजीनामा दिला का, असा सवाल केरे पाटील यांनी उपस्थित केला.
शरद पवारांवर आरोप
काही लोक समाजाला बदनाम करत आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे खच्चीकरण करण्याचे काम समाजातील नेते करत आहेत, असे केरे पाटील म्हणाले. शरद पवार यांनी १९९४ साली चूक केली होती आणि मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. १९९४ साली शरद पवार यांनी १६७ जाती ओबीसीमध्ये टाकण्याचे काम केले होते. त्या जीआरच्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत. त्यावेळी शरद पवार यांनी हा जीआर काढला नसता तर आज ही वेळ आली नसती. जर या मुख्यमंत्र्यांनी जीआर रद्द केला तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असेही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे.
Leave a Reply