आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना विश्वासात न घेता नागपुरात शेतकऱ्यांच्या मोर्चाची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवार यांच्या भूमिकेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे रोहित पवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांच्या भूमिकेवर आता त्यांच्या पक्षातीलच माजी आमदार रमेश कदम यांनी घणाघात केला आहे.
## कदम यांची टीका
माजी आमदार आणि मातंग समाज अभ्यासक आयोगाचे अध्यक्ष रमेश कदम म्हणाले की, पवार हे आडनाव बाजूला काढले तर रोहित पवार यांचे राजकीय वजन शून्य आहे. महाराष्ट्रात अजित पवार हेच एकमेव दादा होते आणि दुसरा दादा होणे शक्य नाही, असे त्यांनी ठणकावले. रोहित पवार हे प्रसिद्धीच्या कॅमेऱ्यावर अवलंबून असतात; कॅमेरा नसेल तर ते कार्यालयातही बसत नाहीत, असा आरोप कदम यांनी केला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या व्यक्तीला विधिमंडळात इतका वेळ बोलण्याची संधी कशी मिळते, असा सवालही त्यांनी केला. पहिल्या कार्यकाळात कामकाज शिकायलाच पाच वर्षे लागतात, असे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पहिल्या रांगेत बसत असतानाही रोहित पवार त्यांना नमस्कार करण्यासाठी जात नाहीत आणि पक्षाच्या शिस्तीला आव्हान देतात, असा आरोप कदम यांनी केला.
## मी म्हणजे पार्टी?
कदम पुढे म्हणाले की, रोहित पवार स्वतःलाच पक्ष समजण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे अजिबात चालणार नाही. त्यांच्या भाषणांमध्ये शरद पवार किंवा राष्ट्रवादीचा उल्लेख नसतो, असे कदम म्हणाले. सुप्रिया सुळे नाराज आहेत आणि ही नाराजी केवळ माध्यमांसमोर बोलली जात नाही, तर कार्यकर्त्यांमध्येही आहे, असे त्यांनी सांगितले. पैसा असला तरी तो कामाला येणार नाही; त्यांचे एकमेव भांडवल म्हणजे पवार हे आडनाव आहे, असे कदम म्हणाले. राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली, त्यामागेही हेच आडनाव असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात आजही प्रत्येक मतदाराला फक्त शरद पवार दिसतात, असे कदम म्हणाले. पुढच्या मोर्चासाठी त्यांना पैसे देऊन माणसे आणावी लागतील, अशा कठोर शब्दांत कदम यांनी टीका केली.
Leave a Reply