पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने शिरोमणी अकाली दलासोबत पुन्हा युती केली आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी एकत्रितपणे युतीची घोषणा केली.
शाह काय म्हणाले
अमित शाह यांनी या पत्रकार परिषदेत अकाली दलाचे एनडीएमध्ये स्वागत केले. आज आमचा सर्वात जुना मित्रपक्ष एनडीएमध्ये परत आला आहे, असे ते म्हणाले. पंजाबला अमली पदार्थ आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करणे हा या युतीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थमुक्त पंजाब करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२९ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. लवकरच जाहीरनाम्यात महत्त्वाच्या घोषणा करण्यात येतील, असेही शाह म्हणाले.
सुखबीर सिंग बादल आणि नितीन नवीन हे गेल्या तीन महिन्यांपासून युतीसाठी वाटाघाटी करत होते, असे शाह यांनी सांगितले. पंजाब विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची जनता आपल्याला विजयी करेल, अशी आशा व्यक्त केली. अकाली दल मोठ्या भावाच्या भूमिकेत असून पंजाबमध्ये मुख्यमंत्री अकाली दलाचा होईल, असेही शाह म्हणाले.
युतीचा इतिहास
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही अकाली दलाचे एनडीएमध्ये स्वागत केले. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती नैसर्गिक असून ती पंजाबच्या जनतेसाठी आणि हिंदू-शीख ऐक्यासाठी फायदेशीर राहील, असे ते म्हणाले. युतीनंतर दोन्ही पक्षांचे नेते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने याआधी पाच वेळा युती करून निवडणुका लढल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये एकत्र येत निवडणुका लढल्या. या पाचपैकी तीन वेळा त्यांनी एकत्र सरकार स्थापन केले. १९९७, २००७ आणि २०१२ मध्ये या दोन्ही पक्षांनी पंजाबमध्ये सरकार स्थापन केले होते.
Leave a Reply