दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर आणि शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होतील का, यावर गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये थेट भूमिका मांडली. पवार एनडीएत जाणार नाहीत, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
विलीनीकरणावर भुजबळ काय म्हणाले
दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्र येण्याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाही या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चा वारंवार माध्यमांतून समोर येत असल्याचे भुजबळ म्हणाले. मात्र, मला स्वतःला तसे वाटत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. शरद पवार एनडीएत जातील का, या प्रश्नावर त्यांनी ते एनडीएत जाणार नाहीत, असे सांगत अनेक अटकळींवर पडदा टाकला.
हिवाळी अधिवेशनाबाबत संकेत
एखादा विषय योग्य वाटला तर त्याला मदत करता येते, असे सांगत भुजबळांनी आगामी हिवाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि मतदान पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळू शकतो, असे संकेत दिले. निर्णय होईपर्यंत फक्त चर्चा सुरू असतात, असे ते म्हणाले. मतदारसंघ पुनर्रचनेचा विषय योग्य असेल तर ते मदत करतील, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत विचारले असता त्यांनी मिश्कील शैलीत तुम्हाला वाटत असेल तर त्यांना कळवा, अशी प्रतिक्रिया दिली.
दुष्काळावरही भाष्य
दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढत असल्याचे भुजबळ म्हणाले. नाशिकच्या काही तालुक्यांची स्थिती अतिशय वाईट असून तेथून काही प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. दुष्काळी भागातील गरिबांना अन्नधान्य मोफत देण्यात येणार असून केशरी कार्डधारकांनाही मोफत धान्य मिळणार आहे. हा विषय उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार असून मुख्यमंत्री त्याबाबत घोषणा करतील, असे त्यांनी सांगितले. जनावरांसाठी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणे, वन विभागाच्या जमिनीवर चारा निर्माण करणे आणि सरकारकडून चारा खरेदी करणे यावरही त्यांनी भर दिला. मनरेगाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्रातील कामे करावीत, असेही ते म्हणाले.
Leave a Reply