राज्य परिवहन महामंडळाचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बदल करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांच्या कार्डमध्ये रक्कम भरताना आकारले जाणारे ११.८० रुपयांचे कमिशन आता रद्द होणार आहे. त्याचबरोबर कार्डमध्ये आता पाच रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कमिशनची तरतूद बंद, एकसमान शुल्क
एनसीएमसी कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी नियुक्त अधिकृत एजंटला प्रत्येक व्यवहारामागे ११.८० रुपये कमिशन दिले जात होते. या रकमेत विविध करांचा समावेश होता. त्यामुळे रक्कम भरल्यानंतर ही रक्कम वजा होऊन उर्वरित रक्कम कार्डात जमा होत असे. प्रवाशांच्या मागणीनुसार ही कमिशनची तरतूद आता बंद करण्यात आली आहे. आता अधिकृत एजंट आणि वाहकांकडून रक्कम भरण्यासाठी एकसमान शुल्क आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यावर व्यवहार कर आकारला जाणार असल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज
ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटीचे भाडे कमी आकारले जाते. त्यामुळे कार्डमध्ये अतिरिक्त रक्कम शिल्लक राहते. यामुळे प्रवाशांनी कमी रकमेत रिचार्ज करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ५० रुपयांच्या पटीऐवजी आता पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सवलतधारकांना ५, १०, १५, २० अशा रुपयांचे रिचार्ज करणे शक्य होणार आहे. पहिल्यांदा पाच रुपये आणि त्यानंतर पाच रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
भीम ॲपमधूनही रिचार्ज शक्य
एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज करण्यासाठी भीम ॲपचाही पर्याय महामंडळाने उपलब्ध केला आहे. एसटीतील वाहक आणि स्थानकातील टॉपअप काउंटर तसेच अधिकृत एजंटांकडूनही रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी १६ फेब्रुवारीपासून कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. २३ नोव्हेंबरपर्यंत एक कोटी ४७ लाख सवलतधारकांनी नोंदणी केली असून सध्या एक कोटी २९ लाख कार्ड सक्रिय आहेत. नोंदणीनंतर ३० दिवसांत सवलतधारकांना कार्ड उपलब्ध करून दिले जाते. कार्ड मिळण्यास विलंब झाल्यास नोंदणीवेळी मिळालेल्या क्यूआर कोडच्या पावतीवरून प्रवासादरम्यान तिकीट मिळवता येते. पावती उपलब्ध नसल्यास अधिकृत एजंटकडून तिची पुनर्मुद्रित प्रत घेण्याची सुविधाही आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड संलग्न प्रवासभवन नोंदणी आणि बायोमेट्रिक पडताळणीची सुविधा असून फेस ऑथेंटिकेशनचाही पर्याय विकसित केला जात आहे.
Leave a Reply