ठरलं तर मग मालिकेच्या २४ नोव्हेंबरच्या भागात सुभेदारांच्या घरी भाऊबीजेचा सण उत्साहात पार पडला. अस्मिताने अर्जुन आणि अश्विनला ओवाळल्यानंतर अश्विन तिथेच बसून राहिला. सायलीला वाटले होते की तो तिच्याकडून ओवाळून घेणार नाही. पण यावेळी तो स्वतःहून भाऊबीज करायला सांगतो. त्यामुळे सायली खूप खूश झाली. त्याने सायलीसाठी खास भेटवस्तूही आणली होती. पण सायलीने ती स्वीकारली नाही. तिला अश्विनकडून दुसरेच काहीतरी हवे होते.
सायलीची अनोखी मागणी
सायलीने अश्विनला सांगितले की तिला भेटवस्तू नको. ती प्रियाच्या बाळाला घेऊन आली आणि अश्विनला म्हणाली की एकदा फक्त माझ्यासाठी या बाळाला मायेने स्पर्श करा. तिची ही मागणी ऐकून शांत असलेल्या अश्विनचा राग अनावर झाला. तो पुन्हा घरात गोंधळ घालू लागला. घरातील इतरांनीही सायलीवर राग व्यक्त केला. अश्विन म्हणाला की प्रिया किती खोटारडी आहे, हे माहीत असूनही हे बाळ त्याच्या नावावर का दिले जात आहे. त्याला या बाळाला माया द्यायची नाही. सायलीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो चिडून निघून गेला.
अर्जुनने घेतली सायलीची बाजू
सगळे सायलीला ओरडत असताना अर्जुन मध्ये पडला आणि त्याने सायलीची बाजू घेतली. तो म्हणाला की अश्विनने हे सगळे स्वतःच ओढवून घेतले आहे आणि आता तो यातून पळ काढत आहे. जेव्हा अश्विनने प्रियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याने आणि सायलीने हात जोडून त्याला तसे न करण्याची विनंती केली होती. पण तेव्हा कोणीच त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर त्या बाईने घराला सर्व प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता तिला शिक्षा झाली असली, तरी त्या निष्पाप बाळाचा काय दोष, असा सवाल अर्जुनने केला.
हे सगळे दारात उभा असलेला अश्विन ऐकत होता. तो म्हणाला की हे बाळ त्याचे नाही. काही गोष्टींचे नियोजन आधीच केलेले होते. त्यामुळे हे बाळ त्याचे असूच शकत नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्वांसमोर असे बोलावे लागेल, असे त्याला कधी वाटले नव्हते. हे बोलताना तो खूप दुखावलेला होता. दुसरीकडे, घरात चाललेले सगळे तमाशे श्वेता प्रियाला वेळोवेळी कळवत असते. त्यामुळे प्रिया खूप खूश आहे.
सायलीला प्रियाच्या बाळाची खूप काळजी वाटत असते. घरातील कोणीच त्या बाळाशी मायेने वागत नाही. अशातच तिचे स्वतःचे बाळ अचानक रडू लागले. सायली प्रियाच्या बाळाला खाली घेऊन आली. पण स्वतःच्या बाळाला एकटे टाकून आली म्हणून कल्पना तिच्यावर चिडली. तितक्यात तिला पुन्हा तिच्या मुलीच्या रडण्याचा आवाज आला. तिच्या मुलीला डायपरमुळे रॅश आले होते म्हणून ती रडत होती. तिला औषध लावून शांत केल्यावर पुन्हा प्रियाचे बाळ रडू लागले. सायलीला वाटले की खाली कल्पना आहे, म्हणजे ती बाळाला बघेल. पण प्रियाचे बाळ रडत असताना दिसत असूनही कल्पना त्याला रडत ठेवून तशीच निघून गेली. हे सगळे पाहून सायलीला आश्चर्य आणि वाईट दोन्ही वाटले.
Leave a Reply