ताप आला किंवा गळ्यात खवखव सुरू झाली की अनेकांना वाटतं, अँटिबायोटिक घेतलं की लगेच बरं वाटेल. या समजुतीमुळे अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेताच ही औषधं घेतात. तात्पुरता आराम मिळाल्यासारखा वाटला तरी या सवयीचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवं.
बहुतांश वेळा सर्दी, खोकला किंवा हवामान बदलल्यानंतर गळ्यात होणारा त्रास विषाणूंमुळे होतो. अँटिबायोटिक विषाणूंवर अजिबात काम करत नाही. त्यामुळे अशा वेळी ही औषधं घेऊन काहीच फायदा होत नाही. फक्त जिवाणूंमुळे झालेल्या संसर्गाच्या उपचारातच ही औषधं उपयुक्त ठरतात. विनाकारण घेतलेली अँटिबायोटिक उलट त्रास वाढवू शकतात, असं देहराडून येथील कैलाश हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. गोपाळ शर्मा यांनी सांगितलं आहे.
अँटिबायोटिकचे दुष्परिणाम कोणते?
अँटिबायोटिक घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होणं, पोटदुखी आणि त्वचेवर पुरळ उठणं असे त्रास जाणवतात. काही वेळा गंभीर अॅलर्जीही होऊ शकते. त्याचबरोबर या औषधांमुळे पोटातील चांगल्या जिवाणूंचं संतुलन बिघडतं. हे चांगले जिवाणू अन्न पचवण्यात मदत करतात, त्यामुळे पचनावरही परिणाम होतो.
वारंवार घेतल्यास औषध निकामी होण्याचा धोका
गरज नसताना अँटिबायोटिक घेत राहिल्यास जिवाणू हळूहळू त्या औषधापासून स्वतःचा बचाव करायला शिकतात. याचा अर्थ असा की, पुढे खरोखर जिवाणूंमुळे संसर्ग झाला तर तेच औषध कदाचित व्यवस्थित काम करणार नाही. त्यामुळे ताप-सर्दीची लक्षणं दिसताच स्वतःहून अँटिबायोटिक घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं हाच सुरक्षित मार्ग आहे.
Leave a Reply