संसदेत सत्ताधारी युतीने परिसीमन विधेयक मांडल्यास शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जागा दुपटीने वाढत असतील तर या विधेयकासोबत असणे फायद्याचे ठरेल, असे मत अध्यक्ष शरद पवार यांनी खासदारांशी झालेल्या चर्चेत मांडले.
खासदारांना हे धोरण मान्य आहे. मात्र पक्षाचे आठपैकी बहुतांश खासदार भाजपविरोधात निवडून आले आहेत, त्यामुळे सत्ताधारी आघाडीसोबत जाणे फायद्याचे नाही, अशी भूमिका त्यांनी नोंदवली.
मंत्रिपदांवरून पक्षात चर्चा
भाजपच्या नेतृत्वाखालील युतीत राज्यात चौथा पक्ष म्हणून स्थान मिळाल्यास केंद्रात एखादे मंत्रिपद वाट्याला येईल आणि ते सुप्रिया सुळे यांना मिळेल, अशी शक्यता चर्चेत आहे. मात्र धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा आग्रह धरणाऱ्या शरद पवार यांच्या कन्येने मंत्रिपद घेणे योग्य आहे काय, याचाही विचार पक्षात होत आहे. आठ खासदारांच्या संख्याबळावर दोन मंत्रिपदे मिळाली तरी ती फायद्याची नाहीत, असे काहींचे मत आहे.
महाराष्ट्रात दहा आमदार असलेल्या शरद पवार गटाला ऊर्जा आणि गृहनिर्माण खाते हवे आहे. या पदांसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची नावे चर्चेत आहेत. अजित पवार गटाचा या प्रस्तावाला विरोध आहे. शिंदे शिवसेनेलाही गृहनिर्माण खाते राष्ट्रवादीला द्यायची इच्छा नाही. राज्यातील नेतृत्वाने मंत्रिपदे देण्यास अनुकूलता दाखवलेली नाही.
बाहेरून पाठिंब्याचा निर्णय
परिसीमन विधेयक महिला आरक्षणाला वाट करून देणार असल्याने त्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, असे सध्याचे मत आहे. अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना शरद पवार यांनी समवेत असावे, असे वाटत असले तरी पार्थ पवार यांचा या हालचालीस ठाम विरोध आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे खासदार पुत्र पार्थ यांचा विलीनीकरणास विरोध आहे; सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळणार असेल तर ते पार्थ यांनाही मिळायला हवे, असा या दोघांचा आग्रह आहे.
संसदेचे संस्थगित अधिवेशन केव्हाही सुरू होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आठ आणि डीएमकेचे २२ खासदार या विधेयकाला अनुकूल असतील तर ते पारित होऊ शकेल, असे पक्षात मानले जात आहे. मतदारसंख्या वाढून महिलांना आरक्षण मिळायला हवे, याला पक्षाचा पाठिंबा आहे; मात्र सरकारमध्ये जाण्याचा विचार नाही, असे पक्षाच्या एका बड्या नेत्याने सांगितले.
Leave a Reply