शिवसेनेतील फूट आणि सत्ताबदलाच्या काळात धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या जीवाला धोका होता, असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका पॉडकास्टमध्ये केला. त्यावर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
शिरसाट यांनी पॉडकास्टमध्ये सांगितले की, फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर ते ठाण्याला गेले. तेथून सुरतकडे जात असताना एका टोल नाक्याजवळ तीन ते चार किलोमीटर लांब वाहनांची रांग होती. गाड्या सुरतकडे जाऊ नयेत यासाठी ही रांग लावण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर शिंदे यांनी तेथील पोलीस अधीक्षकांना फोन करून वाहतूक सुरळीत करण्यास सांगितले, असे शिरसाट म्हणाले.
तो आमदार मीच असल्याचे पाटील यांनी मान्य केले
पाऊस पडत होता आणि एक आमदार परत जाण्यासाठी धडपडत होता. आम्ही थांबवलं नसतं तर त्याचं रामनाम सत्य झालं असतं, असा दावा शिरसाट यांनी केला. तो आमदार आपणच असल्याचे कैलास पाटील यांनी मान्य करत पलटवार केला. परत येताना हे लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याची जाणीव आपल्याला होती आणि त्याची तयारी आपण ठेवली होती, असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री चौकशी करणार का, असा सवाल
राज्याचे मंत्री उघडपणे असे बोलत असतील तर त्यांना ही हिंमत येते कुठून, असा सवाल पाटील यांनी केला. सत्तेच्या जोरावर आपले काहीही होऊ शकत नाही, असे त्यांना वाटते का, असेही त्यांनी विचारले. घटनेला चार वर्षे झाली असून आपण तक्रार करणार नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सत्तेतील मंत्र्यांची चौकशी करणार का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणावर शिरसाट यांनीच स्पष्टीकरण दिले पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
Leave a Reply