खजिना हा मानवासाठी नेहमीच आश्चर्याचा विषय राहिला आहे. जमिनीखाली गाडलेला सोन्याचा, दागिन्यांचा खजिना सापडावा यासाठी अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. पृथ्वीच्या पोटातून कधीकधी असे काही बाहेर येते जे सर्वांनाच थक्क करते. याआधी सोन्याची नाणी, दागिने तसेच रत्नजडित मूर्ती खोदकामात सापडल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी असाच एका महिलेचा अनमोल दागिना जमिनीतून शोधून काढण्यात आला. आज हा दागिना सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
सातव्या शतकाच्या अखेरीस तयार केलेले लॉकेट
हा सोन्याचा दागिना साधारण १३०० वर्षांपूर्वीचा असावा, असा अंदाज लावला जातो. ब्रिटनमध्ये जमिनीखाली तो गाडला गेला होता. हा दागिना एखाद्या छोट्या लॉकेटप्रमाणे आहे. परंतु त्यावरील कलाकुसर आणि नक्षीकाम पाहून पुरातत्त्व क्षेत्रातील तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे, सातव्या शतकाच्या अखेरीस तयार करण्यात आलेले हे लॉकेट एका ख्रिश्चन महिलेचे असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. ब्रिटनमधील नॉरफोक परिसरातील ग्रेट यारमाउथजवळील मार्थम येथे फेब्रुवारी २०२५ मध्ये मेटल डिटेक्टरच्या मदतीने हा ऐतिहासिक दागिना शोधण्यात आला होता.
अवघ्या ३ सेंटीमीटरच्या लॉकेटवर आश्चर्यकारक कलाकुसर
या लॉकेटची लांबी ३.१६ सेंटीमीटर म्हणजेच जवळपास १.२ इंच असल्याचे सांगितले जाते. आकाराने हा दागिना अगदी लहान दिसतो. परंतु त्यावरील डिझाईन खूपच विशेष आहे. नॉरफोकच्या फाइंड्स लायझन ऑफिसर डॉ. हेलन गीके यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, यामध्ये सोन्याच्या तारांपासून डिझाईन तयार करण्यात आले आहे. या लॉकेटच्या मध्यभागी क्रॉससारखी आकृती आहे. त्यामध्ये लाल रंगाचा खडा आहे. सध्या हा दागिना सुरक्षित ठेवण्यात आला असून, सुंदर दागिन्याचा हा एक चांगला नमुना असल्याचे बोलले जाते.
Leave a Reply