मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

चीनची चंद्रावर खाणींची योजना; २०५० पर्यंत उत्खननाचा आराखडा

चीनने २०५० पर्यंत चंद्रावर खाणकाम सुरू करण्याचा आराखडा सादर केला आहे. 'चांग-ए' मोहिमेत चंद्रावरील बर्फ आणि ऑक्सिजन वेगळे करण्याच्या तंत्रज्ञानावर काम होणार आहे.

चीनची चंद्रावर खाणींची योजना; २०५० पर्यंत उत्खननाचा आराखडा

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवून तब्बल ५० वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, मानवाचे चंद्रावरील पृष्ठभागाबाबतचे गूढ काही कमी झालेले दिसत नाही. त्यानंतर जागतिक महासत्तांमध्ये चंद्रावर नवनवीन प्रयोग करण्याची जणू चढाओढच लागली आहे. त्यातच आता चीनने अमेरिकेच्या एक पाऊल पुढे टाकत भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजना समोर आणली आहे.

२०५० पर्यंत चंद्रावर खाणकामाचा आराखडा

चीनने २०५० पर्यंत चंद्रावर मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू करण्याचा आराखडा सादर केला आहे. ‘चांग-ए’ मोहिमेंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावरील बर्फ आणि ऑक्सिजन वेगळे करण्याच्या तंत्रज्ञानावर काम करण्यात येणार आहे. २०३० पर्यंत पाणी आणि ऑक्सिजन उत्पादन तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे, तर २०४० पर्यंत एक प्रात्यक्षिक प्रकल्प उभारला जाणार आहे. ‘जर्नल ऑफ डीप स्पेस एक्सप्लोरेशन’मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात भौतिकशास्त्रज्ञांनी या मोहिमेबाबत खुलासा केला आहे.

चीनच्या चंद्र मोहिमांचा धडाका

याआधी चीनने चंद्रावर अनेक यशस्वी मोहिमा केल्या आहेत. चांग-१ मोहीम चंद्राच्या कक्षेतून निरीक्षण आणि पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यासाठी होती. चांग-३ मोहिमेत चंद्रावर यान आणि रोव्हर लँडिंग करण्यात चीन यशस्वी झाला. चांग-४ मोहीम चंद्राच्या मागच्या भागात लँडिंग करणारी जगातील पहिली मोहीम ठरली. चांग-५-टी१ मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावरून १,७३१ ग्रॅम माती आणि खडकांचे नमुने घेऊन यान पृथ्वीवर परतले. चांग-६ मोहीम चंद्राच्या मागच्या भागातून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी चीनची पहिली मोहीम ठरली.

चीनने चंद्रावर उतरण्याच्या मोहिमेबाबत आधीपासून तयारी सुरू केली आहे. चीनने केवळ यशस्वी प्रयोगच केले नाहीत, तर त्याच्या विकासातही लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे जागतिक महासत्तांची नजर पृथ्वीबाहेर थेट चंद्रावरील खनिज संपत्तीवर पडल्याचे दिसत आहे. चीनने नव्या मोहिमेचे संकेत दिल्याने अंतराळ क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance