मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर भव्य होणार; ९० देशांतून अर्ज आले

पुणे ग्रँड टूर स्पर्धेसाठी ९० देशांतून अर्ज आले आहेत. २०३२ ची वर्ल्ड चॅम्पियनशिप पुण्यात होणार असून, सुनैत्रा पवार यांनी भव्य आयोजनासाठी तयारीचे निर्देश दिले.

पुणे ग्रँड टूर भव्य होणार; ९० देशांतून अर्ज आले

अजितदादांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेने अल्पावधीतच जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात २०३२ ची वर्ल्ड चॅम्पियनशिप पुण्यात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढली असून, तब्बल ९० देशांमधून या स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

नियोजनबद्ध तयारीचे निर्देश

यंदाची स्पर्धा अधिक भव्य आणि जागतिक दर्जाची होण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनैत्रा पवार यांनी दिले. पुणे ग्रँड टूरच्या आयोजनासंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. स्पर्धेची व्याप्ती वाढली असून, त्यासाठी आवश्यक असणारा रस्ते विकासाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या कामांमध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये, असे त्या म्हणाल्या.

स्पर्धेच्या काळात वाहतुकीचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहतुकीसंदर्भात केलेले नियोजन नागरिकांना आणि प्रवाशांना वेळेत समजेल, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेला अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी

पुण्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारी ही स्पर्धा यंदाही मागील वर्षाप्रमाणेच भव्य, दर्जेदार आणि यशस्वी होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, या बैठकीत उपस्थित आमदारांनी पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली.

उपमुख्यमंत्री सुनैत्रा पवार पुणे दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे बैठकीसाठी उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यांनी प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance