मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वादग्रस्त बांधकाम परवानग्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या क्षेत्रातील पाच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशांच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालातून दोन प्रकरणांतील बांधकाम परवानग्या रद्द करण्यात आल्याचं, एका प्रकरणातील बांधकाम परवानगीला स्थगिती देण्यात आल्याचं, तर इतर प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर अभिप्रायाची प्रतीक्षा सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाईंदरमधील आरक्षणाच्या जागेवरील बांधकामाचा वाद न्यायप्रविष्ट
पहिल्या प्रकरणात भाईंदर येथील सर्वे क्रमांक ५७८, ६४४, ६४५ आणि ६४९ मधील एकत्रित २४,९५२ चौ.मी. क्षेत्राच्या जमिनीचा समावेश आहे. या जमिनीवर मे. ग्रँडबिल्ड लँड डेव्हलपर्स एलएलपी या विकासकाला १६ डिसेंबर २०२२ रोजी एकूण ६६,२७४.११ चौ.मी. बांधकाम क्षेत्रासाठी विकास परवानगी देण्यात आली होती. यामध्ये विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक १३८ अंतर्गत प्राथमिक शाळा आणि खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेल्या ३,८०० चौ.मी. क्षेत्राचाही समावेश होता. मात्र, यूडीसीपीआरमधील विनियम ११.१ च्या तरतुदीनुसार शाळेच्या आरक्षणाचा विकास करताना किमान २,००० चौ.मी. भूखंड नियोजन प्राधिकरणाला हस्तांतरित करणं आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. या प्रकरणात आमदार नरेंद्र मेहता यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेकडे तक्रार केली होती. संबंधित जमिनीच्या मालकी हक्काबाबत ठाणे न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्रमांक ४८१/२०१४ दाखल आहे. महापालिकेने २९ एप्रिल २०२६ रोजी सुधारित बांधकाम परवानगी दिली होती, मात्र आरक्षणाच्या जागेतील किमान भूखंड हस्तांतरणाच्या तरतुदीचा मुद्दा पुढे आल्याने ४ मे २०२६ रोजी बांधकाम परवानगीला स्थगिती देण्यात आली. विकासकाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २१ ऑगस्ट २०२६ रोजी उच्च न्यायालयाने महापालिकेला स्थगिती उठविण्याचे आणि त्याबाबत महारेराला कळविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेने स्थगिती उठवून २४ ऑगस्ट रोजी महारेराला माहिती दिली. या प्रकरणात प्रशासकीय पातळीवरील त्रुटी आणि न्यायालयीन आदेशांच्या अनुषंगाने महापालिकेने नगररचना विभागातील शाखा अभियंता आणि विधी विभागातील लिपिक यांच्यावर ७ सप्टेंबर २०२६ रोजी निलंबनाची कारवाई केली. ८ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात महापालिकेने शपथपत्रही सादर केलं. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
नवघरमधील सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनची बांधकाम परवानगी रद्द
दुसऱ्या प्रकरणात नवघर येथील सर्वे क्रमांक २४०/६ ब या जमिनीचा समावेश आहे. या जमिनीवर मे. सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीने २०१८ मध्ये बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता. महापालिकेने २१ जुलै २०१८ रोजी बांधकाम परवानगी दिली होती. मात्र, तक्रारदार अजगर अली वोरा यांनी हरकत घेतल्यानंतर तसेच ठाणे दिवाणी न्यायालयातील विशेष दिवाणी दावा क्रमांक ९४६/२०११ मधील आदेश विचारात घेऊन २२ जुलै २०१९ रोजी ही परवानगी रद्द करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने १६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित दावा निकाली काढल्यानंतर विकासकाने पुन्हा बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला. महापालिकेने १७ एप्रिल २०२६ रोजी ५,०७५.५३८ चौ.मी. बांधकाम क्षेत्रासाठी विकास परवानगी दिली. मात्र, त्यानंतर जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात पुन्हा वाद निर्माण झाला. अर्जदार अजगर अली वोरा यांनी परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, विकासक मे. सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या वास्तुविशारदांनीही मालकी हक्कासंदर्भातील वादाचं कारण देत स्वतःच बांधकाम परवानगी मागे घेण्याची विनंती महापालिकेकडे केली. त्यानुसार महापालिकेने १६ सप्टेंबर २०२६ रोजी बांधकाम परवानगी रद्द केली. या प्रकरणात संबंधित जागेतील १८ मीटर रुंद विकास आराखडा रस्ता महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी करण्यात आलेला नोंदणीकृत करारनामा देखील रद्द करण्यात आला आहे. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात करारनामा रद्द करण्याची नोंदणी करण्यात आली.
तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणात कायदेशीर अभिप्रायाची प्रतीक्षा
तिसऱ्या प्रकरणात नवघर येथील सर्वे क्रमांक १३८ (४६२)/४ आणि १३८ (४६२)/७ या एकूण ३,२४० चौ.मी. क्षेत्राच्या जमिनीचा समावेश आहे. या जागेवर निकेत खुशाल रंबिया यांच्यामार्फत २८ फेब्रुवारी २०२४ रोजी ९,५९०.६९ चौ.मी. बांधकाम क्षेत्रासाठी महापालिकेने विकास परवानगी दिली होती. मात्र, संबंधित जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात वाद आणि न्यायालयीन गुंतागुंत निर्माण झाल्याने महापालिकेने २३ सप्टेंबर २०२६ रोजी बांधकाम परवानगीला स्थगिती दिली. या निर्णयाची माहिती महारेरालाही देण्यात आली. केवळ स्थगिती देऊन न थांबता संबंधित बांधकाम परवानगी पूर्णपणे रद्द करता येईल का, याबाबत बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य विधी अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयातील वरिष्ठ अभियोक्ता अॅड. रामचंद्र आपटे यांच्याकडे कायदेशीर अभिप्राय मागविला आहे. चौथ्या प्रकरणात नवघर येथील सर्वे क्रमांक १३१ आणि १३२ मधील एकूण ३५,३१० चौ.मी. क्षेत्राच्या जमिनीचा समावेश आहे. या जागेतील काही भाग निवासी वापरासाठी असून विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक २९९ अंतर्गत बगीच्यासाठीही जागा राखीव आहे. या जागेसंदर्भात जी.एन. कन्स्ट्रक्शन आणि इतर संबंधित पक्षांच्या बाबतीत मालकी हक्क आणि न्यायालयीन वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रकरणातही अॅड. रामचंद्र आपटे यांच्याकडून विशेष दिवाणी दावा क्रमांक ४८१/२०१४ आणि आरईए-४१/२०२० मधील आदेशांच्या अनुषंगाने अभिप्राय मागविण्यात आला आहे. मात्र, हा अभिप्राय अद्याप प्राप्त झालेला नसल्याने महापालिकेकडून पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही.
वरसावे येथे मेडिटेशन सेंटरचा प्रस्ताव; बांधकाम परवानगी अद्याप नाही
पाचव्या प्रकरणात वरसावे येथील सुमारे १ लाख १६ हजार ४२० चौ.मी. क्षेत्राच्या जमिनीवर मेडिटेशन अँड रिक्रिएशनल सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. या प्रस्तावासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समितीकडे प्रक्रिया सुरू होती. ठाणे वन विभागाने महापालिकेकडे यासंदर्भात अभिप्राय मागविला होता. महापालिकेने २३ मे २०२३ रोजी संबंधित समितीकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर वन विभागाने २४ मार्च २०२६ रोजी पुन्हा अभिप्राय मागविला. त्यानुसार महापालिकेने १ एप्रिल २०२६ रोजी यूडीसीपीआरमधील विनियम ४.२ (vi) आणि ४.११ (xv) यांचा विचार करून संबंधित प्रस्तावाबाबत अभिप्राय सादर केला. मात्र, या जागेवरील प्रस्तावासंदर्भात महापालिकेने अद्याप कोणतीही बांधकाम परवानगी दिलेली नसल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील या प्रस्तावाबाबत पुढील निर्णय संबंधित समितीच्या प्रक्रियेनुसार होणार आहे.
Leave a Reply