ऑफिस, सायबर कॅफे किंवा हॉटेलमधील सार्वजनिक संगणकावरून व्हॉटस्अॅप वापरण्याची सवय अनेकांना असते. मात्र ही सवय महागात पडू शकते, असा इशारा सायबर सुरक्षा यंत्रणेने दिला आहे. एकापेक्षा अधिक जण वापरत असलेल्या संगणकावर तुमचे व्हॉटस्अॅप खाते लॉगिन राहिले, तर त्याचा गैरवापर होऊ शकतो.
भारत सरकारशी जोडलेल्या आयफोरसी (I4C) संस्थेच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिटने याबाबत माहिती दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या संगणकावर व्हॉटस्अॅप वेब वापरताना अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे या युनिटने म्हटले आहे.
लॉगिन राहिल्यास काय धोका?
अशा संगणकावर तुमचे खाते सुरू राहिले आणि त्याचा वापर चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेला, तर ती व्यक्ती तुमची खासगी चॅट वाचू शकते. एवढेच नाही, तर तुमच्या नावावर मोठ्या फसवणुकीचा प्रकार किंवा फिशिंगसारखे गुन्हेही घडू शकतात. सायबर गुन्हेगार अशा संधीची वाटच पाहत असतात, असा इशारा देण्यात आला आहे.
वापरानंतर काय करावे?
वापर झाल्यानंतर संबंधित संगणकावरून आठवणीने तुमचे खाते लॉग आऊट करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक जण खाते लॉग आऊट न करता थेट ब्राउझर बंद करतात. मात्र केवळ ब्राउझर बंद केल्याने खाते बंद होत नाही; पुन्हा ब्राउझर सुरू करताच व्हॉटस्अॅप पुन्हा सुरू होते. त्यामुळे ब्राउझर बंद करण्याबरोबरच व्हॉटस्अॅपही लॉग आऊट करावे. सार्वजनिक संगणकावर व्हॉटस्अॅप वापरायची वेळ आलीच, तर खासगी ब्राउझरचा वापर करावा, असाही सल्ला देण्यात आला आहे.
Leave a Reply