झारखंडच्या जमशेदपूरमध्ये रविवारी झालेल्या महिला पतंजली योग समितीच्या प्रांतीय महासम्मेलनात योगगुरू रामदेव बाबा यांनी कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्री यांच्या भूतबाधा दरबारावर आणि त्यांनी केलेल्या राम-कृष्ण यांच्या तुलनेवर रामदेव बाबा यांनी नाराजी व्यक्त केली.
रामदेव बाबा नेमकं काय म्हणाले?
काही लोक वेद, दर्शन आणि उपनिषदांचा अभ्यास करत नाहीत, कुराण वाचत नाहीत, रामायण-महाभारताचा अभ्यास करत नाहीत, असं रामदेव बाबा म्हणाले. अशा लोकांना संविधान आणि लोकशाही यांचीही माहिती नसते, तरी ते स्वतःला सनातनी म्हणवून घेतात आणि हिंदू धर्म वाचवण्याचा दावा करतात, अशी टीका त्यांनी केली. अशा लोकांना त्यांनी पाखंडी आणि धूर्त असं संबोधलं.
महिलांनी सावध राहावं, असा इशारा
धर्माच्या नावावर धार्मिक उन्माद निर्माण केला जात असल्याचं रामदेव बाबा म्हणाले. चुकीचे विचार आणि चुकीच्या व्यक्तींपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. अशा कथाकारांमुळे सर्वाधिक फटका महिला, आई-बहिणी आणि मुलींना बसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोक आधी देवी-देवतांची तुलना करतात आणि नंतर माफी मागतात, त्यामुळे महिलांनी अशा कथावाचकांपासून सावध राहावं, असंही ते म्हणाले. या टीकेला बागेश्वर बाबा काय उत्तर देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
Leave a Reply