जमीनमालकांना ग्राहक म्हणून मान्यता देत गृहप्रकल्प हस्तांतरित झाल्यानंतर जुन्या विकासकाचं सदनिकेचं आश्वासन आणि जबाबदाऱ्या झटकणाऱ्या ‘रिवेरा प्रोजेक्ट्स एलएलपी’ या विकासकाला महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणानं (महारेरा) मोठा झटका दिला आहे. बोट क्लब रस्ता परिसरातील ‘मार्वल रिवेरा’ प्रकल्पातील मूळ जमीनमालकांना ग्राहक म्हणून मान्यता देत ६० दिवसांच्या आत त्यांच्या नावे सदनिका नोंदवून देण्याचे आदेश महारेरानं दिले आहेत.
तसेच, ताबा देण्यास झालेल्या विलंबापोटी २०१५ पासून व्याज आणि तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रुपये तक्रारदारांना देण्याचे आदेश महारेरानं दिले आहेत. महारेराचे सदस्य रवींद्र देशपांडे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी मूळ जमीनमालक दिलरेझ गोपाल आणि फराह जहीर वकील यांनी अॅड. गौरव नाशिककर आणि अॅड. मोनिश जैन यांच्यामार्फत महारेराकडे तक्रार दाखल केली होती.
करार काय होता?
तक्रारदारांनी बोट क्लब रस्ता येथील आपली जमीन सप्टेंबर २०१२ मध्ये मार्वल ड्वेलिंग्स प्रा. लि. (जुना विकासक) यांना विकली होती. या व्यवहारात दोन्ही तक्रारदारांना प्रत्येकी दीड कोटी रुपये आणि ‘मार्वल रिवेरा’ या प्रकल्पात पाच कोटी रुपये किमतीची प्रत्येकी एक सदनिका व पार्किंगची जागा देण्याचा करार झाला होता.
मार्च २०१५ पर्यंत तक्रारदारांना सदनिकांचा ताबा मिळणार होता. मूळ विकासकानं डिसेंबर २०२२ मध्ये तक्रारदारांना सदनिका वाटपाची कागदपत्रं दिली होती. मात्र, प्रकल्प दिवाळखोरीत गेल्यानं जानेवारी २०२४ मध्ये तो ‘रिवेरा प्रोजेक्ट्स एलएलपी’ या नव्या विकासकाकडे हस्तांतरित झाला. नव्या विकासकानं जुन्या विकासकाच्या करारांना बांधील नसल्याचं सांगत सदनिका देण्यास नकार दिला होता.
निकाल का महत्त्वाचा?
महारेराचा हा निकाल ऐतिहासिक आहे. जमीनमालक विकासकांनी दिलेल्या सदनिकेच्या आश्वासनावर आधारून जमिनीचा हिस्सा विकतात. आतापर्यंत स्थावर संपदा कायदा तुमच्यासाठी नाही, असंच त्यांना सांगितलं जात होतं. मात्र, या निर्णयानं आता ही परिस्थिती बदलणार आहे. जमीनमालकांनाही यापुढे ग्राहक मानलं जाईल आणि घरखरेदीदारांना मिळणारं कायद्याचं संरक्षण त्यांनाही मिळेल, असं तक्रारदारांचे वकील अॅड. गौरव नाशिककर आणि अॅड. मोनिश जैन यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply