गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. डिलिमीटेशन बिलावरूनही त्यांनी काही आरोप केले आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डिलिमीटेशन बिलाला पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत संकेत दिले होते. त्यामुळे रोहित पवार पक्षात एकटे पडले आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान यावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रोहित पवार यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनादरम्यान ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत, यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
बावनकुळे यांचे निमंत्रण
बावनकुळे म्हणाले की, रोहित पवार यांना विनंती करतो की, त्यांच्या सरकारकडून काही मागण्या असतील तर त्यांनी बैठकीला यावे. त्यांच्या मागण्या ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत आणि मी त्यांना निमंत्रित करतो, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान रोहित पवार यांना राजकीय मोर्चा काढायचा आहे का, असा सवाल करतानाच बुधवारी त्यांनी आमच्या बैठकीला यावे. समाधान झाले नाही तर मोर्चा काढावा, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
पडीक जमिनीबाबत स्पष्टीकरण
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी तीन वर्षे जमीन पिकवली नाही तर शासनाकडे जमा करू हा निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नसल्याचे स्पष्ट केले. राज्यात काही लोकांनी फार्मसाठी 50 एकर आणि 100 एकर जमिनी घेतल्या आहेत. अशा जमिनी आठ-आठ वर्षांपासून पडीक आहेत. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा काही संबंध नाही. हा नियम कुठल्याही सर्वसाधारण शेतकऱ्याला लागू नाही. ज्यांनी जमिनी खरेदी करून लँड बँक तयार केली, त्यासाठी हा निर्णय आहे. अशी जमीन छोट्या शेतकऱ्यांना भाडेपट्ट्याने देता येते. काही लोकांनी जाणीवपूर्वक अर्थाचा अनर्थ केला, असेही ते यावेळी म्हणाले.
Leave a Reply