नाशिकच्या चांदवड तालुक्यातील जोपुळ गावात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. खेळता खेळता तीन वर्षीय शंभू दत्तू दाते हा चिमुकला तब्बल २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. ही घटना समजताच गावात एकच खळबळ उडाली.
पाच फूट खोलीवर अडकला, ग्रामस्थ धावले
सुदैवाने हा चिमुकला बोअरवेलमध्ये अवघ्या पाच फूट खोलीवर अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर काढणं शक्य झालं. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत धाडसाने बचावकार्य सुरू केलं आणि अवघ्या ४५ मिनिटांत चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.
या बचावकार्यात भाजपाचे युवा नेते दिगंबर वाघ आणि दत्तात्रय पिंपरकर यांनी दोरीच्या साहाय्याने जीवाची बाजी लावत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसाचं जोपुळसह परिसरातून कौतुक होत आहे.
प्रकृती चांगली, रुग्णालयात दाखल
बाहेर काढल्यानंतर बालकाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. या धाडसी बचावकार्यामुळे गावात सगळीकडे दिलासा व्यक्त होत आहे.
Leave a Reply