हिवाळा सुरू झाला की अनेकांना टाचांना भेगा पडण्याची समस्या जाणवते. टाचांची त्वचा कोरडी होणे, त्वचा निघणे आणि चालताना वेदना होणे अशा तक्रारी उद्भवतात. अनेकजण याकडे केवळ त्वचेचा कोरडेपणा समजून दुर्लक्ष करतात. मात्र, प्रत्येक वेळी टाचांना भेगा पडण्यामागे कोरडी त्वचाच कारणीभूत असते असे नाही. काही वेळा मधुमेह, थायरॉईडशी संबंधित समस्या, त्वचेचे आजार किंवा पायांवर सतत पडणारा दबाव यामुळेही टाचांना भेगा पडू शकतात. त्यामुळे टाचांच्या भेगांकडे दुर्लक्ष न करता त्यामागील कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
टाचांना भेगा पडण्यामागील ८ कारणे
मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये टाचांना भेगा पडण्याचा धोका वाढू शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्वचेवर आणि नसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पायांची त्वचा कोरडी पडणे, जखमा उशिरा भरणे आणि भेगांमधून संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हायपोथायरॉईडिझम म्हणजेच थायरॉईड ग्रंथी कमी सक्रिय असल्यास त्वचा कोरडी आणि खरखरीत होऊ शकते. त्वचेची लवचिकता कमी झाल्यास टाचांवर भेगा पडण्याचा धोका वाढू शकतो. एक्झिमा हा त्वचेशी संबंधित आजार असून यामध्ये त्वचेवर खाज, लालसरपणा, कोरडेपणा आणि जळजळ जाणवू शकते. पायांच्या तळव्यांवर किंवा टाचांवर एक्झिमा असल्यास त्वचा फाटून भेगा पडू शकतात. सोरायसिसमध्ये त्वचेच्या पेशींची वाढ वेगाने होते. त्यामुळे त्वचेवर जाड, कोरडे आणि खवलेदार थर तयार होतात. विशेषतः पायांच्या तळव्यांवर सोरायसिस असल्यास टाचांवर खोल भेगा पडू शकतात. पायांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्यास त्वचा सोलणे, खाज येणे, जळजळ होणे आणि त्वचेला भेगा पडणे अशा समस्या जाणवू शकतात. विशेषतः बोटांच्या मधील भागात आणि पायांच्या तळव्यांवर अशी लक्षणे दिसू शकतात. शरीराचे वजन जास्त असल्यास चालताना टाचांवर अधिक दबाव पडतो. त्यामुळे टाचेच्या खालच्या भागातील मऊ ऊती बाजूला पसरतात आणि त्वचेवर ताण निर्माण होतो. त्वचा जाड व कमी लवचिक झाल्यास भेगा पडू शकतात. कामानिमित्त अनेक तास उभे राहावे लागत असल्यास टाचांवर सतत दबाव पडतो. विशेषतः कठीण जमिनीवर अनवाणी चालणे किंवा बराच वेळ उभे राहणे यामुळे टाचांची त्वचा जाड होऊन भेगा पडण्याची शक्यता वाढते. सतत चप्पल किंवा मागून उघडे असलेले सँडल वापरल्यास टाचांना योग्य आधार मिळत नाही. त्यामुळे चालताना टाचेच्या त्वचेवर ताण आणि दबाव वाढतो. योग्य आकाराची आणि टाचांना आधार देणारी पादत्राणे वापरणे गरजेचे आहे.
टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी काळजी
दररोज अंघोळीनंतर टाचांना मॉइश्चरायझर लावावे. युरिया असलेले मॉइश्चरायझिंग क्रीम डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने वापरावे. रात्री झोपण्यापूर्वी टाचांना पेट्रोलियम जेली लावून सुती मोजे घालावेत. खूप गरम पाण्याने पाय धुणे टाळावे. अनवाणी चालण्याऐवजी योग्य पादत्राणे वापरावीत. टाचांवरील जाड त्वचा ब्लेड किंवा कात्रीने काढू नये. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे तज्ज्ञांच्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
Leave a Reply