राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडकी बहीण योजनेवरून मोठे विधान केले आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या भीतीने लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे. धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय, अशी अवस्था लाडकी बहीण योजनेमुळे झाली आहे. या योजनेमुळे सध्याच्या परिस्थितीत सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे, अशी कबुलीच नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. झिरवाळ यांच्या विधानावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
## बावनकुळे काय म्हणाले
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काही काळ असा ताण येतो. पण राज्य सरकार ताण निवळण्यासाठी सक्षम आहे. यावर्षी दुष्काळ आहे, पुढच्या वर्षी त्यातून मार्ग काढू. पण लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही. त्या योजनेला अधिक मजबूत करण्याचे काम आमचे सरकार करेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
## इतर मंत्र्यांच्या प्रतिक्रिया
झिरवाळ यांच्या विधानावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. झिरवाळ यांनी लाडक्या बहिणींबाबत असे बोलणे टाळले असते तर बरे झाले असते. लाडक्या बहिणीने आपल्याला सत्तेवर आणलेले आहे. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत. मात्र ते सुद्धा मिळून जातील, असे हसन मुश्रीफ म्हणाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ते झिरवाळ यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. झिरवाळ यांचे ते वैयक्तिक मत असावे. मात्र यामुळे अनेक बहिणी कामाला लागल्या आहेत. एखादे विकास काम कमी झाले असावे, पण या योजनेचा आधार महिलांना मिळत आहे, ही योजना बंद होणार नाही, असे शिरसाट म्हणाले.
## झिरवाळ नेमके काय म्हणाले होते
लाडकी बहीण योजना आणि दुष्काळ यामुळे सरकारची मोठी आर्थिक कसरत सुरू असल्याची कबुली खुद्द अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. निवडणुकीपूर्वी आमच्या सरकारला ही योजना सुरू करण्यासाठी कोणी सांगितले नव्हते. तरीही आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, आता धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था झाली आहे. आता त्यांना बाजूलाही करू शकत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे आणि त्यात हा दुष्काळ आलाय, असे नरहरी झिरवाळ म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. १९७२ मध्ये अन्नाचा दुष्काळ होता. मात्र आज अन्नाची टंचाई नाही. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागल्यास मोठा निधी लागेल आणि त्यामुळे यंदा तसेच पुढच्या वर्षीही काहीशी आर्थिक चणचण भासू शकते, असे मत झिरवाळ यांनी व्यक्त केले होते.
Leave a Reply