गोव्याचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतात गजबजलेले समुद्रकिनारे, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि गर्दीने भरलेले शॅक. पण या किनारपट्टीवरील राज्याची आणखी एक बाजू आहे, जी फारशी चर्चेत येत नाही. ती म्हणजे शांतता, निसर्ग आणि स्वतःसोबत घालवलेला निवांत वेळ. गर्दीपासून दूर जाऊन, स्वतःची गती मंदावून, रोजच्या धावपळीतून ब्रेक घ्यायचा असेल, तर गोव्यात अशी काही ठिकाणं आहेत, जी तुमच्या यादीत नक्की असायला हवीत.
गोव्याची शांत बाजू अनुभवणारी पाच ठिकाणे
अरपोरा भागात असलेलं रेनेसां गोवा हे १७५ खोल्यांचं हॉटेल गोव्याच्या खास वैशिष्ट्यांवर आधारलेला अनुभव देतं. इथल्या जेवणाच्या चवी, पोर्तुगीज वारसा आणि किनारपट्टीचा प्रभाव यांचा मिलाफ पाहुण्यांच्या अनुभवात गुंफलेला असतो. हे ठिकाण केवळ राहण्यापुरतं नाही, तर स्थानिक चव, रचना आणि पाक परंपरा जवळून अनुभवण्याची संधी देतं.
कँडोलिमच्या मध्यभागी असलेलं ला एस्टोरिया हे आयएचसीएल सिलेक्शन्सचं एक छोटं, देखणं रिट्रीट आहे. इंडो-पोर्तुगीज वारसा आणि आधुनिक सुखसुविधा यांचा समतोल इथे साधला गेला आहे. ही मालमत्ता कँडोलिम बीचपासून केवळ ७०० मीटर अंतरावर आहे, म्हणजे चालत सुमारे १५ मिनिटांत किनाऱ्यावर पोहोचता येतं. लोकप्रिय किनारे आणि स्थानिक बाजार जवळ असूनही इथलं वातावरण गावासारखं शांत राहतं.
दक्षिण गोव्यातील कर्टोरिम गावात असलेलं मानसाओ कर्टोरिम हे २२३ वर्षं जुन्या पोर्तुगीज वारसा हवेलीत उभारलेलं ठिकाण आहे. जुन्या शानमध्ये ती पुन्हा उभी करण्यात आली आहे. पारंपरिक इंडो-पोर्तुगीज वास्तुकला आणि आधुनिक सुविधा यांचा संगम इथे पाहायला मिळतो. हिरवगार परिसर, जुनी चर्च आणि पसरलेली भातशेती यांच्या मधोमध हे शांत ठिकाण वसलेलं आहे.
कँडोलिमजवळील नेरुलमध्ये असलेलं सोल दे गोवा हे नव्याने डिझाइन केलेलं ठिकाण आहे. गोवन वारसा, पोर्तुगीज प्रेरित वास्तुकला आणि आधुनिक शहरी भव्यता यांचं मिश्रण इथे आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण तहिलियानी यांनी ही मालमत्ता डिझाइन केली आहे. पारंपरिक गोवन-पोर्तुगीज प्रभाव आणि परिष्कृत आतील रचना यांचा समन्वय इथल्या अनुभवाला वेगळं रूप देतो.
बेतुल बीच हे गोव्यातील असं ठिकाण आहे, जिथे गर्दी अगदी कमी असते. नारळाच्या बागा आणि पश्चिम घाटाच्या टेकड्यांचं दृश्य यासाठी हे ठिकाण ओळखलं जातं. पर्यटकांनी या ठिकाणाला ४.२ गुणांकन दिलं आहे.
निवांत सुट्टीसाठी ही ठिकाणे का निवडावीत?
सुट्टी म्हणजे केवळ फिरण्याची यादी पूर्ण करणं नव्हे, तर काहीही न करता प्रत्येक क्षणाचा आनंद घेणंही असतं, हे ही ठिकाणं दाखवून देतात. शांत समुद्रकिनाऱ्यावर आराम करणं, स्थानिक जेवणाचा स्वाद घेणं, लपलेल्या कॅफेचा शोध घेणं किंवा ताजेतवाने करणाऱ्या वेलनेस अनुभवात हरवून जाणं, अशा अनेक संधी गोव्यात स्वतःसोबत घालवलेल्या वेळेत मिळतात. त्यामुळे पुढच्या वेळी गोव्याला जाण्याचा विचार करत असाल, तर या पाच ठिकाणांचा नक्की विचार करा.
Leave a Reply