मधुमेह झाल्यानंतर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. सोशल मीडियावर ३० दिवसांत मधुमेह बरा करण्याचे दावे करणारे अनेक व्हिडिओ दिसतात. काही जण विशिष्ट पदार्थ खाण्याचा, तर काही जण औषधे बंद करण्याचा सल्ला देतात. मात्र या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटोलॉजी विभागातील सल्लागार डॉ. निशा कैमल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मधुमेह बरा होणे आणि नियंत्रणात येणे वेगळे
डॉ. कैमल यांच्या मते, मधुमेह पूर्णपणे बरा होणे आणि मधुमेह नियंत्रणात येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वैद्यकीय भाषेत मधुमेह रिव्हर्स होण्याला ‘रिमिशन’ असे म्हणतात. याचा अर्थ मधुमेहाची औषधे न घेता किमान तीन महिने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहणे. पण याचा अर्थ मधुमेह कायमचा संपला असा होत नाही. शरीरात रक्तातील साखर वाढण्याची प्रक्रिया कायम राहू शकते. त्यामुळे पुन्हा जुन्या खाण्याच्या सवयी सुरू झाल्या किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष झाले, तर रक्तातील साखर पुन्हा वाढू शकते.
टाइप १ आणि टाइप २ मधुमेहातील फरक
मधुमेहाचे टाइप १ आणि टाइप २ असे दोन वेगळे प्रकार आहेत. टाइप २ मधुमेहात शरीरातील इन्सुलिन योग्य पद्धतीने काम करत नाही, याला इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. वजन, व्यायाम, खाण्यापिण्याच्या सवयी, झोप, ताणतणाव, आनुवंशिकता आणि वय अशा अनेक गोष्टींचा यावर परिणाम होतो. टाइप २ मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार असल्याने काही रुग्णांमध्ये हा आजार रिमिशनमध्ये जाऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले आणि त्याच वेळी योग्य प्रयत्न सुरू केले, तर रिमिशन मिळण्याची शक्यता अधिक असते.
टाइप १ मधुमेह हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे. या आजारात रोगप्रतिकारक शक्ती इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते, त्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होणे बंद होते. टाइप १ मधुमेह आहार, सप्लिमेंट्स किंवा डिटॉक्स पद्धतींनी बरा होत नाही. त्यामुळे टाइप १ मधुमेह असलेल्या रुग्णांना इन्सुलिन बंद करण्याचा सल्ला देणे चुकीचे आहे. असे केल्यास त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य?
सोशल मीडियावर कारले, दालचिनी, ॲपल सायडर व्हिनेगर किंवा वनस्पतींपासून तयार केलेल्या पावडरमुळे मधुमेह पूर्णपणे बरा होतो, असे दावे केले जातात. काही पदार्थ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. पण कोणताही एक पदार्थ मधुमेह पूर्णपणे बरा करू शकत नाही.
सोशल मीडियावर मधुमेहाची औषधे शरीरासाठी हानिकारक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काही रुग्ण स्वतःहून औषधे बंद करण्याचा विचार करतात. मात्र असे करणे धोकादायक आहे. मधुमेहाची औषधे केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवत नाहीत, तर हृदय, किडनी, डोळे आणि शरीरातील नसांचेही संरक्षण करतात. त्यामुळे औषधांचे प्रमाण कमी करायचे असेल किंवा औषधे बंद करायची असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
काही लोक मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी खाण्यावर खूप जास्त बंधने घालतात. काहींना डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशा आहाराचा फायदा होऊ शकतो. मात्र प्रत्येकासाठी हा आहार योग्य असेलच असे नाही. अशा आहारामुळे रक्तातील साखर अचानक कमी होऊ शकते, शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. इन्सुलिन किंवा रक्तातील साखर कमी करणाऱ्या गोळ्या घेणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
रिमिशनसाठी काय करावे?
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि टाइप २ मधुमेह रिमिशनमध्ये आणण्यासाठी काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. ज्यांचे वजन जास्त आहे, त्यांनी हळूहळू आणि सातत्याने वजन कमी करणे महत्त्वाचे आहे. टाइप २ मधुमेह रिमिशनमध्ये जाण्यासाठी वजन कमी करणे हा सर्वात महत्त्वाचा जीवनशैलीतील बदल मानला जातो. दररोज वेगाने चालणे आणि स्नायू मजबूत करणारे व्यायाम केल्याने शरीराला इन्सुलिनचा योग्य वापर करता येतो. पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी करणेही गरजेचे आहे.
मधुमेहाची औषधे न घेता रक्तातील साखर सामान्य झाली, तरी नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. कारण रिमिशन म्हणजे मधुमेह कायमचा बरा झाला असे नाही. काही काळानंतर रक्तातील साखर पुन्हा वाढू शकते. त्यामुळे वेळोवेळी रक्ताच्या तपासण्या करणे, डोळ्यांची तपासणी करून घेणे, किडनीचे कार्य तपासणे आणि पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर पुन्हा वाढू लागल्याचे वेळीच लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचार करणे सोपे जाते.
Leave a Reply