लग्नसराईच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच व्यवहार दिवशी, गेल्या काही दिवसांपासून घसरणीला आलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी अचानक युटर्न घेतला आहे. लग्नसराईच्या काळात दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोमवारी (२३ नोव्हेंबर, २०२६) रोजी तुमच्या खिशाला धक्का बसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या तीव्र घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीपूर्वी आणि फेडरल रिझर्व्हकडून येणाऱ्या नवीन संकेतांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार व्याजदरांबाबत विचार करत असताना गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी व्यापाराच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमती सावरल्याचे पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या किमतीत सुमारे १.१ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ९ टक्के घसरणीनंतर सोन्याचा भाव १४ महिन्यांच्या नीचांकीवर गडगडला होता. याशिवाय चांदीच्या किमतीतही २.६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात १५ टक्के घट झाली होती. अशाप्रकारे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी काहीशी सुधारणा दिसून येत आहे. त्याचवेळी बाजारातील गुंतवणूकदार सध्या अमेरिकेतील व्याजदरांचे भवितव्य, महागाईचा दबाव आणि डॉलरची मजबूती यांसारखे घटक विचारात घेत आहेत.
देशांतर्गत दर काय आहेत
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा मागोवा घेत देशांतर्गत फ्युचर बाजार म्हणजे एमसीएक्सवरील दरांमध्येही अचानक बदल झाला आहे. सोन्याचा वायदा बाजाराच्या सुरुवातीला १.९० टक्के किंवा २३०० रुपयांनी वाढून १,२४,०५० वर पोहोचला, तर चांदीच्या फ्युचर्स किमतीत २.५३ टक्के किंवा ३७०० रुपयांनी वाढ होऊन १,५१,५३९ रुपये झाल्या आहेत.
लग्नसराईचा काळ सुरू झाला असून या दरम्यान आठवड्याच्या पहिल्याच व्यवहार दिवशी सोने-चांदीच्या दरांनी युटर्न घेतल्यामुळे ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. घरातील लग्नसराईनिमित्त सोने खरेदी करण्याची अनेकांनी योजना आखली असेल, पण सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या कपाळावर आठ्या आल्या असतील. गुड रिटर्न्सच्या ताज्या माहितीनुसार २४ कॅरेट १० ग्रॅम सोने १,२५,०७० रुपये, तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,१४,६४० रुपये आणि १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९३,८०० रुपये आहे.
Leave a Reply