गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू असतानाच सराफ बाजारातून दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोन्याच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे. शनिवार-रविवार बाजार बंद असताना १,२२,५०० रुपये असलेले सोन्याचे दर आता १,२५,००० रुपयांवर आले आहेत. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसून ते १,५५,००० रुपयांवर स्थिरावले आहेत. हे दोन्ही दर जीएसटीशिवायचे आहेत. मात्र सोन्याच्या दरवाढीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सावरले
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २३ नोव्हेंबर रोजी आशियाई बाजारांमधील व्यवहारादरम्यान सोन्याच्या किमतीत १.२ टक्क्यांची सुधारणा झाली आणि त्याची किंमत प्रति औंस सुमारे ३,५७६ डॉलरवर पोहोचली. गेल्या आठवड्यात जवळपास ९ टक्के घसरून सोन्याची किंमत १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, म्हणजेच ३,५१३.५४ डॉलर प्रति औंसवर पोहोचली होती. शुक्रवारी सोन्याच्या किमती १४ महिन्यांतील नीचांकी पातळीवर (सप्टेंबर २०२५) घसरल्या होत्या. गेल्या आठवड्यातील ९ टक्क्यांची घसरण ही बाजारातील एक लक्षणीय घसरण मानली जाते. मार्च २०२६ नंतर प्रथमच सोन्याच्या किमती एकाच आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळाली, त्यामुळे किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या अमेरिकी सोने फ्युचर्समध्येही आज १.७ टक्क्यांची वाढ झाली.
अमेरिकेतील महागाईकडे लक्ष
आता अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी अमेरिकेची वैयक्तिक उपभोग खर्च (पीसीई) आकडेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह या आकडेवारीला महागाईचा सर्वात महत्त्वाचा निर्देशक मानते. या माहितीवरून फेड आपल्या डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर आणखी वाढवणार की नाही, हे ठरेल. दरम्यान, फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांनी शुक्रवारी व्याजदरात आणखी वाढ करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा सध्याचा धोरणात्मक दर महागाईला आळा घालण्यासाठी पुरेसा नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर डिसेंबरच्या बैठकीत ०.२५ टक्के व्याजदरवाढीची ९३ टक्के शक्यता असल्याचे बाजार भाकीत करत आहे. उच्च व्याजदर आणि १९ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेला अमेरिकी डॉलर सोन्याच्या किमतींवर दबाव आणत आहेत.
उच्च व्याजदर आणि मजबूत डॉलरचा सोन्यावर परिणाम
जेव्हा व्याजदर उच्च राहतात, तेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचे प्रकार बदलतात. जेव्हा अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते, तेव्हा अमेरिकी सरकारी रोखे आणि बँक ठेवींवरील निश्चित आणि सुरक्षित व्याजदर वाढतात. अशा परिस्थितीत मोठे गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून रोख्यांमध्ये गुंतवतात, त्यामुळे सोन्याची मागणी कमी होते आणि किमती घसरतात. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यवहार डॉलरमध्ये होत असल्याने, जेव्हा डॉलर महाग होतो, तेव्हा भारतासह इतर देशांसाठी सोने खरेदी करणे अधिक महाग होते. त्यामुळे खरेदी कमी होऊ लागते आणि किमती खाली येऊ लागतात.
Leave a Reply