ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुरतला गेलेल्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचला गेल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यापैकी एका आमदाराला इंजेक्शन देऊन, तर दुसऱ्याच्या अंगावर ट्रक घालून संपवण्याचा प्रयत्न होणार होता. राऊत यांनी तिन्ही आमदारांची नावेही जाहीर केली असून, या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिरसाट यांच्या दाव्यानंतर राऊतांचा दावा
याआधी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं, असा दावा केला होता. त्यानंतर राऊत यांनी आपला दावा मांडला. राऊत म्हणाले की, सुरतहून परत येणाऱ्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता. आता मंत्री असलेले प्रकाश आबिटकरही परत येणार होते. त्यांनी सुरुवातीला परतण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना अडकवून ठेवलं गेलं.
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर हार्ट अटॅक येईल अशा प्रकारचे उपचार करण्यात आले आणि त्यांना इंजेक्शन देण्यात आलं होतं. ते कसे मारले जातील, हा डाव होता आणि हा एक कट होता, असं राऊत म्हणाले.
कैलास पाटील यांच्यावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
कैलास पाटीलही सुरतहून पळून जात होते. तेव्हा त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावा राऊत यांनी केला. शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे तेच सांगितल्याचं राऊत म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, नितीन देशमुख यांनी तिथून संघर्ष करून पळ काढला, तर कैलास पाटील काही मैल चालत आले. त्यांच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता होती, तरीही ते आले. इतर आमदारांना जबरदस्तीने कोंडून ठेवल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी हे तीन प्रकरणं आपल्याकडे उदाहरण म्हणून असल्याचं सांगितलं. त्यांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Leave a Reply