सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बिस्लेरी पाण्यात कर्करोगकारक घटक; FSSAI कडून खटल्यास मंजुरी

बिस्लेरीच्या पाण्यात ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले. रेफरल लॅबच्या तपासणीतही धोकादायक घटक सापडल्याने FSSAI ने खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.

बिस्लेरी पाण्यात कर्करोगकारक घटक; FSSAI कडून खटल्यास मंजुरी

प्रवासात किंवा अन्य ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या बिस्लेरी कंपनीच्या पॅकबंद पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाण्यात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे काही घटक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भारतीय खाद्य आणि सुरक्षा मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

दोन तपासण्यांत पाणी असुरक्षित

प्राथमिक माहितीनुसार बिस्लेरी कंपनीच्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासणीत असुरक्षित आढळला होता. FSSAI ने बिस्लेरीच्या आवारातून घेतलेल्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये ब्रोमेट या रासायनिक घटकाचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळले. ब्रोमेट हा संभाव्य कर्करोगजन्य घटक मानला जातो. कंपनीच्या अपीलनंतर नमुना रेफरल फूड लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. रेफरल लॅबच्या तपासणीत पाण्यात पॉलीन्यूक्लियर अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आढळले. दोन्ही तपासण्यांत पाणी असुरक्षित ठरल्याने अन्न सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता न्यायालयीन खटल्यात बिस्लेरी कंपनीच्या पाण्याबाबत नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येणार आणि काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही शंका उपस्थित झाली होती

यापूर्वी ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये बिस्लेरीच्या बाटल्यांमध्ये नाल्याचे किंवा अस्वच्छ पाणी फिल्टर करून भरले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हा कंपनीने संबंधित जागा बिस्लेरीचा प्लांट नसल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हादेखील बिस्लेरीच्या पाण्याबाबत शंका उपस्थित झाली होती.

FSSAI कडून आणखी कारवाई

दुसरीकडे FSSAI कडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. उर्मी लाईफ सायन्सेस एलएलपी आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर या दोन उत्पादनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच वसंत मसाला, टीआयटी-बीआयटी फुडस इंडिया, मिमान्सा इंडस्ट्रीज आणि आशा कॉन्फेक्शनरी या कंपन्यांविरोधातही न्यायालयीन खटला चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance