बेंगळुरू शहराच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे नवे आयुक्त म्हणून हेमंत निंबाळकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे याचबरोबर अँटी राउडी स्कॉड या नव्या विशेष यंत्रणेचे आयुक्तपदही सोपवण्यात आले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्या खांद्यावर आले आहे. कोल्हापूरचे सुपुत्र असलेले निंबाळकर हे कर्नाटकातील धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात.
कर्नाटक सरकारने बेंगळुरूच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच अँटी राउडी स्कॉडची निर्मिती केली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती, टोळ्यांशी संबंधित गुन्हे, वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालणे हे या यंत्रणेचे मुख्य काम असणार आहे. या यंत्रणेचे पहिले आयुक्त म्हणून निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकासह देशभरातून त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
गुंडगिरी करणाऱ्यांना थेट इशारा
जबाबदारी हाती येताच निंबाळकर यांनी शहरातील गुंडांना थेट इशारा दिला आहे. सुधारायचे असेल तर माझ्याकडे या, त्याचा मार्ग मी सांगेन, असे ते म्हणाले. मात्र सर्वसामान्यांना आणि महिलांना त्रास द्यायचा असेल किंवा दहशत पसरवून पैसा कमवायचा असेल, तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम त्यांनी दिला. आपल्या भागात कोणताही गोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चांगले जीवन जगा आणि चांगले काम करा, मग मी तुमच्याकडे पाहणारही नाही, असे निंबाळकर म्हणाले. मात्र इकडे-तिकडे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तर मी तुमच्यासमोर उभा असेन, असा इशाराही त्यांनी दिला. शहरात कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, तर कायद्याने पोलिसांना लाठीबरोबरच बंदूक दिली आहे आणि ती केवळ दाखवण्यासाठी नाही, असे त्यांनी सांगितले. वेळ आल्यास प्रत्येक उपायाचा वापर केला जाईल, असेही ते म्हणाले.
सर्वसामान्यांना त्रास देऊ नका, रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि मुलींना त्रास देऊ नका आणि हातावर पोट असलेल्या गरिबांना त्रास देऊ नका, असे आवाहनही निंबाळकर यांनी केले. शहरात असे चित्र दिसले, तर मी आहेच, असा इशारा त्यांनी दिला.
निंबाळकर यांची आतापर्यंतची कारकीर्द
हेमंत निंबाळकर हे १९९८ च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. जवळपास २८ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना त्यांची कारकीर्द विशेष गाजली. मराठी-कन्नड वाद आणि हिंदू-मुस्लिम वाद त्यांनी शांततेने हाताळले आणि शहरासह जिल्ह्याला शिस्त लावली. २००७ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील नामचिन गँगस्टर प्रवीण शिंत्रे याचे एन्काउंटर करण्यात आले होते.
बेळगावचे पोलीस अधीक्षक, दहशतवादविरोधी पथक, राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख, बेंगळुरूचे सहआयुक्त आणि राज्याचे अतिरिक्त महासंचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. आयसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा भारतातील हस्तक मेहदी मसरुर विश्वास याला अटक करून त्यांनी त्या संघटनेचे भारतातील जाळे उद्ध्वस्त केले होते. कर्नाटक हे देशातील पहिले नक्षलवादमुक्त राज्य ठरले, त्यातही निंबाळकर यांची विशेष भूमिका होती.
त्यांना २०१४ मध्ये राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले आहे. मुख्यमंत्री विशेष पदकानेही त्यांचा सन्मान झाला आहे. कोल्हापुरातील शेतकरी कुटुंबातून आलेला आणि केबल टाकण्याचे काम करणारा तरुण संघर्ष करत भारतीय पोलीस सेवेत दाखल झाला. आपल्या धडाडीच्या कामगिरीने त्यांनी अनेकांना थक्क केले आहे. आता कर्नाटकातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आली असून, त्यांच्या पुढील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply