मराठी रंगभूमीवर आपल्या दिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे ‘प्रपोजल’ या गाजलेल्या नाटकाच्या नव्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तब्बल ३५० यशस्वी प्रयोगांचा टप्पा गाठलेले हे नाटक आता नव्या कलाकारांसह रंगभूमीवर दाखल होत आहे.
रंगनील निर्मित आणि कल्पना विलास कोठारी प्रस्तुत या नाटकाचे लेखन सुरेश चिखले यांनी केले असून, दिग्दर्शन राजन ताम्हाणे यांचे आहे. या नाटकाला प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि राहुल रानडे यांचे संगीत लाभले आहे. मनाली रायसोनी निर्मिती प्रमुख असून, दीपक गोडबोले सूत्रधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
शेवटच्या लोकलमधील रात्रीची गोष्ट
मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लोकल ट्रेन या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर घरी परतणाऱ्या सर्वसामान्य नोकरदारांचा लोकल प्रवास जिथे संपतो, तिथून या नाटकातील गोष्ट सुरू होते. रात्रीच्या शेवटच्या लोकलमध्ये मोजक्या प्रवाशांच्या उपस्थितीत घडणाऱ्या अनपेक्षित घडामोडी आणि थरार यामुळे या नाटकाची सर्वत्र चर्चा आहे.
मूळ संहिता तशीच, कलाकार नवे
२०१२ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘प्रपोजल’ला नव्या पिढीसमोर पुन्हा सादर करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना राजन ताम्हाणे सांगतात की, गेल्या १० ते १४ वर्षांत प्रेक्षकांची एक नवी पिढी तयार झाली आहे. त्यावेळी जे प्रेक्षक लहान होते, ते आता मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नाटक नव्याने अनुभवण्याची संधी आहे.
नाटकाच्या पुनरुज्जीवनाबाबत आपली भूमिका मांडताना ताम्हाणे संहितेच्या मूळ स्वरूपाबाबत ठाम आहेत. त्यांच्या मते, पुनरुज्जीवन करताना मूळ संहितेत एक पैशाचाही बदल केला जात नाही. संहितेचा गाभा जपून नव्या कलाकारांच्या माध्यमातून तिचा वेगळा आविष्कार घडवणे, हेच या प्रक्रियेचे खरे वैशिष्ट्य आहे. ‘प्रपोजल’मध्ये लोकलचा डबा हाच नाटकाचा अविभाज्य भाग असल्याने तो तसाच ठेवण्यात आला आहे. बदल झाला आहे तो फक्त त्या डब्यात प्रवास करणाऱ्या पात्रांचा.
गेल्या १४ वर्षांत बदललेल्या कलाकारांची देहबोली, संवादफेक आणि अभिनयातील ऊर्जा यामुळे त्याच संहितेचा नवा अनुभव प्रेक्षकांना मिळेल, असा विश्वास ताम्हाणे व्यक्त करतात. धक्कादायक, मजेशीर आणि हृदयद्रावक असे अनेक अनुभव या प्रवासात आहेत. प्रेक्षकांनी हा नाट्यानुभव प्रत्यक्ष रंगमंचावर येऊन घ्यावा, असे त्यांना वाटते.
Leave a Reply