आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. आवळ्यापासून मुरंबा, चटणी, सरबत आणि लोणचे असे विविध पदार्थ बनवता येतात. त्यापैकी आवळ्याचा गोड लोणचा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. या लोणच्याची चव आंबट, गोड आणि किंचित तिखट असल्यामुळे जेवणाची रंगत वाढते. विशेष म्हणजे हे लोणचे बनवण्यासाठी जास्त वेळ किंवा फार मेहनत घ्यावी लागत नाही. घरातील काही मोजक्या साहित्याचा वापर करून तुम्ही सहज आवळ्याचा गोड लोणचा तयार करू शकता.
आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
आवळ्याचा गोड लोणचा बनवण्यासाठी ५०० ग्रॅम आवळे, ३०० ग्रॅम गूळ, २ चमचे लाल तिखट, १ चमचा मोहरीची डाळ, अर्धा चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा हळद, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बडीशेप, चिमूटभर हिंग, २ ते ३ चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावे. आवळ्याच्या आंबटपणानुसार गुळाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. यामुळे लोणच्याला योग्य गोडवा येतो आणि त्याची चव अधिक छान लागते.
लोणचं बनवण्याची कृती
सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुऊन घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये आवळे मऊ होईपर्यंत उकळून घ्या. आवळे थंड झाल्यानंतर त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून बिया काढून टाका. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरीची डाळ, मेथीदाणे, बडीशेप आणि हिंग घालून फोडणी तयार करा. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ घालून मसाला व्यवस्थित परतून घ्या.
या मसाल्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या घालून एकजीव करा. त्यानंतर किसलेला गूळ घालून मंद आचेवर मिश्रण शिजवा. गूळ पूर्णपणे वितळून आवळ्याला घट्टसर पाक तयार होईपर्यंत अधूनमधून हलवत राहा. लोणचे तयार झाल्यानंतर गॅस बंद करून ते पूर्णपणे थंड होऊ द्या.
लोणचे साठवण्याची योग्य पद्धत
तयार झालेले आवळ्याचे गोड लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. लोणच्यामध्ये पाण्याचा किंवा ओलाव्याचा अंश राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. लोणचे काढण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा. जास्त काळ टिकवण्यासाठी लोणचे फ्रिजमध्ये ठेवणे चांगले. हे चविष्ट आंबट-गोड लोणचे पोळी, पराठा, भाकरी किंवा वरण-भातासोबत खायला अतिशय छान लागते. घरच्या घरी तयार केलेला हा पदार्थ जेवणात वेगळीच चव आणतो.
Leave a Reply