अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले आहे. संविधान, लोकशाही आणि मतदानाचा अधिकार जपण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे.
रॅलीत कोण सहभागी होणार
महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या रॅलीत सहभागी होणार आहेत. पक्षाचे सर्व सहप्रभारी, खासदार, आमदार, लोकसभा व जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, लोकप्रतिनिधी तसेच सर्व फ्रंटल, सेल व विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.
रॅलीमागची भूमिका
काँग्रेसच्या मते, केंद्र सरकारने लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली केली असून निवडणूक आयोगालाही कठपुतली बनवले आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार एसआयआरच्या माध्यमातून काढून घेण्याचे काम होत असल्याचा पक्षाचा आरोप आहे. मतचोरी आणि निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभारासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार जबाबदार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ‘अब की बार, ४०० पार’चा नारा देत संविधान बदलण्याचे मनसुबे जनतेने निवडणुकीत हाणून पाडल्याचेही पक्षाने म्हटले आहे. आता डिलिमिटेशन आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून संविधान, लोकशाही आणि संघराज्य व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
देशाचे संविधान वाचवणे ही आजची गरज असून संविधानाच्या रक्षणासाठी पक्षाने देशव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही तत्त्वे जपण्यासाठी तसेच संविधानाच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Leave a Reply